सध्या सोशल मिडियावर एका हत्तीच्या पिल्लांचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. दोन महिन्याचे हे हत्तीचं पिल्लू एका छोट्या टबमध्ये पाण्यात मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. या व्हिडिओला देण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये हत्तीच्या पिल्लाच्या नामकरण सोहळ्यादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एका काँग्रेसच्या खासदारानेही यावर प्रितिक्रिया नोंदवली आहे.

“दक्षिण कन्नड मंदिरातील धर्मशालामधील श्री मंजूनाथ स्वामी मंदिरात या शिवानी या हत्तीच्या पिल्लाचा नामकरण सोहळा पार पडला. त्यानंतर हे पिल्लू पाण्यात खेळत होतं,” असं एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या पिल्लाचा जन्म १ जूलै रोजी झाला आहे. या पिल्लाला पाण्यात खेळायला खूप आवडतं असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टीकच्या बाथटबमधील पाणी शिवानी आपल्या छोट्याश्या सोंडेने सगळीकडे उडवताना दिसत आहे.

३१ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला दोन हजार ३०० हून अधिक जणांनी शेअर केलं आहे. तर दीड लाखांपर्यंत व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी या ट्विटवर प्रितक्रिया देताना शिवानी खूपच गोंडस असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांचाही समावेश आहे. रमेश यांनी, “हे पिल्लू खूपच गोंडस आहे,” असं म्हटलं आहे.

“बाळं कोणत्याही प्राण्याची असली तरी ती गोंडसच असतात,” असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे. तर अन्य एकाने, “हे पिल्लू अगदी एखाद्या बाळाप्रमाणेच वागत आहे. बाळांना पाणी म्हटल्यावर अचानक ऊर्जा मिळते,” असं म्हटलं आहे.