गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहार आणि आसाम या राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांना आपला जीवही गमावावा लागला आहे. येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे अनेक भाग पुर्णतः पाण्याखाली आहे. पूरग्रस्त परिसरात एनडीआरएफचे जवान नागरिकांची मदत करत आहेत. बिहारमधील चंपारण जिल्ह्यात शनिवारी एनडीआरएफ जवानांच्या बोटीवर गर्भवती महिलेची प्रसूती झाली. महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती स्थानिक आधिकाऱ्याने दिली.

चंपारण जिल्ह्याच्या एका आधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये पूरग्रस्त स्थिती आहे. चंपारण जिल्ह्यातील गोबरी गावांतील सबीना खातून (41) या महिलेला शनिवारी रात्री उशीरा प्रसूती कळा सुरू झाल्या. कुटुंबिय सबीनाला जवळील आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी निघाले. पण गावांमध्ये सगळीकडे पाणी साठल्यामुळे जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता. यावेळी प्रसंगावधान राखत गावातील एका व्यक्तीने एनडीआरएफच्या पथकाला सूचना दिली. सूचना मिळाल्यानंतर एनडीआरएफचं पथक देवाप्रमाणं धावून आलं. तात्काळ सबीनाला रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी ते रवाना झाले.

एनडीआरएफच्या बोटीवर नर्सिग असिस्टेंट राणा प्रताप यादवही उपस्थित होते. एनडीआरएफची बोट रूग्णालयाकडे जात असतानाच सबीनाचा त्रास वाढला आणि वेदना असाह्य होऊ लागल्या. कुटुंबिंयाच्या सहमतीनंतर एनडीआरएफ टीमने बोटीवर सबीनाची प्रसूती केली. सबीनाने एका गोडंस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर आई आणि मुलीची प्रकृती उत्तम आहे. एनडीआरएफच्या पथकाने दोघींनाही जवळील रूग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, बिहारमधील जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. बिहारच्या उत्तर भागात पूर परिस्थिती आहे. प्रभावित सीतामढ़ी, मोतिहारी, सुपौल, सहरसा, अररिया, किशनगंज, कटिहार, भागलपुर आणि पूर्णियासह अनेक गावांना पुराचा जास्त फटका बसला आहे. काझीरंगा नॅशनल पार्कला देखील पूर परिस्थिपतीचा फटका बसला आहे. उद्यानाचा जवळपास ७० टक्के परिसर पाण्याखाली गेला आहे. येथील प्राण्यांचे देखील पाणी पातळी वाढल्यामुळे हाल होत आहेत.