आजकाल प्रत्येक कॉफी शॉपमध्ये वाय फाय असते, त्यामुळे कॉफीचा आनंद घेत घेत मोफत इंटरनेटचा वापरही करता येतो. हिच शक्कल लढवत एका चहावाल्याने आपल्या तोट्यात चाललेल्या चहाच्या व्यवसायला नवी उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकमधल्या बेल्लारी गावात राहणारा सैय्यद खादर बाशा नावाच्या चहावाल्याने आपला चहा अधिक विकला जावा यासाठी पाच रुपयाच्या चहावर अर्धातास मोफत इंटरनेट वापरण्याची मुभा ग्राहकाला दिली आहे. ही ऑफर ऐकून दरदिवशी शेकडो ग्राहक सैय्यदकडे चहा प्यायला येतात.
आधी सैय्यदकडचे दिवसाला फक्त १०० कप चहा विकले जायचे पण मोफत चहा मिळताच दिवसाला ४०० कप चहांची विक्री होते. त्यामुळे त्याचा व्यवसाय चौपट वाढला आहे. मोफत इंटरनेटची बातमी ऐकताच दरदिवशी कॉलेज विद्यार्थी येथे येतात. चहा सोबत सैय्यद प्रत्येक ग्राहकाला एक कूपन देतो. यात वाय फायचा पासवर्ड दिला जातो. पासवर्ड दिल्यानंतर अर्धातास ग्राहक इंटरनेटचा वापर करु शकतो. अर्धातास झाल्यावर वायफाय बंद होते. एक ग्राहक दिवसातून फक्त एकदाचा या खास ऑफरचा लाभ घेऊ शकतो. सैय्यद हा पंचवीस वर्षांचा तरुण आहे. आजकाल लोक कॅफेमध्ये बसून मोफत इंटरनेटचा लाभ घेतात आणि हिच शक्कल लढवत ५ रुपयांत मोफत इंटरनेट देत सैय्यद आपल्या बुडत्या व्यवसायाला सावरले आहे. सध्या बेल्लारीमध्ये त्यातूनही सोशल मीडियावर सैय्यदची चर्चा आहे.