जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक म्हणून बनारस किंवा वाराणसीची ओळख आहे. गंगामैया ही या काशीची ओळख. जवळपास ८५ घाट असणाऱ्या या शहरामध्ये काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर अनेकांचे पाय वळतात ते इथल्या गल्ल्यांमध्ये बनारसी खाऊची लज्जत चाखण्यासाठी. ‘ये गंगा मया की नगरी है.. इहा के मेहमान भी शिवजी का रूप होते है..’ अशी इथल्या स्थानिकांची धारणा आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान तुम्ही बनारसला गेलात तर इथे तुमच्या पाहुणचारामध्ये कोणत्याही प्रकारची कसर बाकी ठेवली जाणार नाही. बरं या खादाडीमध्ये सर्वात आवर्जून खावी अशी गोष्ट म्हणजे बनारसी पान. म्हणजे बनारसी पानं नाही खाल्लं तर तिथं जाऊन काय केलं असं म्हटलं जातं. बनारसी पानाचे अनेक प्रकार या शहरात मिळतात. मात्र सध्या येथील पर्यटनाला देशभरातील इतर पर्यटनस्थळांप्रमाणे फटका बसला आहे. काही दुकानं सुरु करण्याची परवानगी नक्की देण्यात आली आहे. मात्र करोनाची भीती असल्याने ग्राहक त्या मनाने कमीच आहेत. असं असलं तरी उपजिवी दुकांनावर असणाऱ्या अनेक लहान मोठ्या दुकानदारांनी सर्व काळजी घेऊन पुन्हा व्यवसाय सुरु केला आहे. या सर्वांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो शहरामध्ये पीपीई कीट घालून पान विक्री करणारा पानवाला…

इंडिया टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या पानवाल्याचे नाव राहुल चौरसिया असं आहे. लंका-अस्सी मार्गावर रविंद्रपुरी परिसरात राहुल यांची पानाची टपरी आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये दोन महिन्याहून अधिक काळ राहुल यांनी दुकान बंद ठेवलं होतं. मात्र आता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यापासून त्यांनी दुकाने सुरु केलं आहे. राहुल यांना त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची काळजी आहे. त्यामुळेच स्वत:ला करोना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि ग्राहकांच्याही सुरक्षेसाठी राहुल चक्क पीपीई कीट घालून टपरीवर पान विक्री करतो. अर्थात डॉक्टर वापरतात त्याप्रमाणे हा वैद्यकीय उपयोगातील पीपीई कीट नसून हा राहुल यांनी एका जवळच्या बाजारातून विकात घेतलेला पीपीई कीटसारखा प्लॅस्टिकचा ड्रेस आहे. मात्र त्याचे काम पीपीई कीटप्रमाणेच आहे. ग्राहकांच्या थेट संपर्कात आपण येऊ नये यासाठी राहुल यांनी ही काळजी घेतली आहे.

“मी हा ड्रेस घालूनच दुकान उघडतो. सकाळी आल्या आल्या संपूर्ण दुकान सॅनिटाइज करतो. कोणी ग्राहक आल्यास त्यांनाही सॅनिटाइजर देतो. त्यानंतरच मी पान बवायला घेतो,” असं राहुल सांगतात. यापुढे मी काही काळ अशाच पद्धतीने सर्व सुरक्षेची काळजी घेऊनच व्यवसाय करणार आहे. यामुळे ग्राहक आणि विक्रेता दोघेही सुरक्षित आहेत, असं राहुल म्हणतात. दिवसभरामध्ये राहुल दोन वेळा आपला पीपीई ड्रेस पूर्णपणे सॅनिटाइज करतात.

लोकांना पानही खायला मिळालं पाहिजे आणि ते सुरक्षितही राहिले पाहिजेत याला माझं प्राधान्य आहे. ग्राहक सुरक्षित रहावेत हाच माझा मुख्य उद्देश असतो, असंही राहुल सांगतात.