कर्नाटकच्या बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या इंजिनिअरने नोकरी जाईल या भीतीमुळे ‘जिगोलो'(देहविक्री किंवा पैशांच्या मोबदल्यात स्त्रियांना शरीरसुख देणारा पुरूष ) सर्व्हिस जॉइन करण्याचा प्रयत्न केला. कमाईचा मार्ग बंद होऊ नये यासाठी या इंजिनिअरने जिगोलो बनण्याचा निर्णय घेतला, पण नोकरीच्या नावाखाली साइबर गुन्हेगारांनी त्याच्याकडून जवळपास 84 हजार रुपये लुटल्याचं समोर आलं आहे. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर आता या इंजिनिअरने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

बंगळुरूच्या मान्यता टेक पार्कमध्ये काम करणाऱ्या या इंजिनिअरने नॉर्थ ईस्ट सीईएन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. हा इंजिनिअर काम करतो त्या कंपनीने लॉकडाउनमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केलं. त्यामुळे आपलीही नोकरी जाईल या भीतीने त्याने दुसरी नोकरी शोधायला सुरूवात केली. ‘बँगलोर मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सात जुलै रोजी इंटरनेटवर त्याला जिगोलो सर्व्हिसची जाहिरात दिसली आणि त्याने जिगोलो बनण्याचं ठरवलं. यासाठी त्याने एका वेबसाइटवर आपले डिटेल्स शेअर केले. काही वेळानंतर याच वेबसाइटवरुन रोनक नावाच्या एका व्यक्तीने त्याला फोन केला.

रजिस्ट्रेशन आणि मेंबरशिप फीच्या नावाखाली उकळले पैसे :-
इंजीनिअरने पोलिस स्थानकात केलेल्या तक्रारीनुसार, रोनक नावाच्या एका व्यक्तीने त्याला रजिस्ट्रेशनसाठी एक हजार रुपये आणि मेंबरशिपसाठी 12 हजार 500 रुपये एका बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगितलं. त्यानंतर त्याच वेबसाइटचं नाव वापरुन, पण दुसऱ्या डिपार्टमध्ये काम करतो असं सांगून अजून एका व्यक्तीने फोन केला आणि त्यानेही पैसे ट्रांसफर करण्यास सांगितले. त्यानंतर विविध डिपार्टमेंटमधून फोन आले आणि पैशांची मागणी केली गेली. पण ८३ हजार ५०० रुपये पाठवल्यांतरही पुढे काही झालं नाही, अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली.

दरम्यान, इंजिनिअरने केलेल्या तक्रारीनुसार फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेत आहोत असे पोलिसांनी सांगितले. तसेच, जिगोलो सर्व्हिस, एस्कॉर्ट सर्व्हिस आणि कॉल बॉय सर्व्हिस अशा नावाखाली अनेक फेक वेबसाइट्सद्वारे लोकांची फसवणूक होत आहे. लोकांनी याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या ऑनलाइन वेबसाइटवर जॉबसाठी अर्ज करताना लोकांनी खातरजमा करायला हवी, असेही पोलिसांनी सांगितले.