फुलझाडांची जागा सामान्यत: घराच्या बाल्कनीत, गॅलरीत किंवा घरासमोरील बागेत असते. मात्र हीच फुलझाडं कधी एखाद्या टॅक्सीमध्ये फुललेली पाहिली आहेत का ? टॅक्सी म्हटलं की प्रवाशांना घेऊन जाणारी चारचाकी हेच प्रथम डोळ्यासमोर येतं. मग त्या टॅक्सीमध्ये अनेकदा आकर्षक आसने, सिटबेल्ट वैगरे पहायला मिळतात. काही वेळा तर प्रवाशांच्या सोयीसाठी फॅनचीही सोय करण्यात आलेली असते. मात्र एक टॅक्सी अशी आहे जी या सा-यापासून निराळीच आहे. तिच्या याच निराळेपणामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

धनंजय चक्रवर्ती या व्यक्तीने आपल्या टॅक्सीचे पूर्ण रुपच पालटवले आहे. पर्यावरणाचा होणारा -हास थांबविण्यासाठी धनंजय यांनी ही नवी संकल्पना अंमलात आणली आहे. त्यांनी आपल्या टॅक्सीमध्येच फुलझाडांची जोपासना केली आहे. बाहेरच्या गरम वातावरणामुळे टॅक्सीतील वातावरणही गरम असतं. यात वातानुकूलित यंत्र बसवण्यापेक्षा नैसर्गिक हवा प्रवाशांना मिळावी यासाठी ही सोय केली आहे.

धनंजय चक्रवर्ती हे पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत असतात. त्यातच टॅक्सीवरच आपली आवड जोपासता आली तर सर्वच मार्ग सुकर होतील या विचाराने त्यांनी टॅक्सीमध्ये फुलझाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर टॅक्सी अधिक आकर्षक दिसावी यासाठी त्यांनी कोलकातामधील काही कार्टुनिस्टकडून टॅक्सीवर चित्रांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक चित्रेदेखील रेखाटून घेतली आहेत. धनंजय यांच्या ग्रीन टॅक्सीविषयी फार कमी जणांना माहित होती. या टॅक्सीचा खरा प्रसार एनडीटीव्हीचे पत्रकार रविशकुमार यांच्या फेसबुक पोस्टमुळे झाला. रविशकुमार यांनी फेसबुक पेजवर या टॅक्सीविषयी लिहील्यानंतर तिची माहिती सर्वदूर पसरत गेली. देशातील ही पहिलीच अशी टॅक्सी आहे जी फुलझाडं आपल्या अंगाखांद्यावर घेऊन फिरते. रविशकुमार यांच्या पोस्टनंतर धनंजय यांनीदेखील ‘बापी ग्रीन टॅक्सी’ हे फेसबुक पेजही तयार करत रविशकुमार यांचे आभार मानले.