अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या रिचर्ड ब्रॅनसन यांच्या व्हर्जिन बीचवर सुट्टीचा आनंद लुटत आहेत. आठ वर्षांपूर्वी हवाई येथे त्यांनी सर्फिंग केले होते तेव्हा ‘जी मज्जा करायची आहे ती आत्ताच करा कारण पुढचे काही वर्ष तरी तुम्हाला सर्फिंग करता येणार नाही’ असे त्यांच्या सुरक्षारक्षकांच्या गटाने त्यांना बजावले होते. ही आठवण रिचर्ड ब्रॅनसन यांनी शेअर केली. आता तब्बल आठ वर्षांनंतर बराक आणि मिशेल ओबामा या सुट्टांच्या मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. व्हर्जिन बीचवर काईट सर्फिंग करतानाचे ओबामा यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

गेल्या आठ वर्षांच्या काळात ओबामा यांना आपल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटता आला नाही, पण जबाबदारीतून हलके झाल्यावर मात्र या दाम्पत्यांनी आपल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटला. व्हर्जिन ग्रुपचे मालक आणि ब्रिटनचे उद्योजक रिचर्ड ब्रॅनसन यांनी ओबामा दाम्पत्याला या बेटावर सुट्ट्या घालवण्याचे निमंत्रण दिले होते. ब्रॅनसन यांनी काइट सर्फिंग करताना ओबामा यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.
ब्रॅनसन आणि ओबामा यांच्यामध्ये काइट सर्फिंगची स्पर्धा सुरू होती. दोघांपैकी कोण जास्तवेळ बोर्डवर टिकून राहतो अशी ही स्पर्धा होती. अर्थात यातही ओबामा अव्वल आले. ब्रॅनसन  ५० मीटरपर्यंत काइट सर्फिंग करण्यात यशस्वी झाले तर ओबामा यांनी कसाबसा १०० मीटरपर्यंचा पल्ला गाठला.