करोनाच्या काळामध्ये अनेकांचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. अनेकांनी घरात बसून इंटरनेटवरच स्वत:चे मनोरंजन करुन घेण्यास प्राधान्य दिलं आहे. अर्थात व्हिडीओ कॉल्स आणि इतर ऑनलाइन माध्यमांमधून लोकं एकमेकांशी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट होत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून मिम्स आणि इतर गोष्टींमध्ये वेळ घालवताना दिसतायत. एकीकडे मनोरंजन आणि जवळच्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असतानाच दुसरीकडे त्याचा तोटाही झाल्याचे जाणवत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही यासंदर्भातील चिंता व्यक्त केली आहे. ट्विलिओने आयोजित केलेल्या डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये बोलताना ओबामा यांनी सोशल मीडियामुळे आपण जवळ येण्याऐवजी दुरावत असल्याचे निरिक्षण नोंदवलं आहे.

फॉर्च्यूनने दिलेल्या वृत्तानुसार बराक ओबामा यांनी सोशल मीडियामुळे आणि इंटरनेटमुळे लोकं स्वत:ची मत आणि विचारांच्या माध्यमातून कशाप्रकारे एकटी पडत आहेत यासंदर्भात भाष्य केलं आहे. “इंटरनेट आणि फेसबुकचा वापर वाढल्याने अनेकजण आपल्याच मर्यादित विचारसरणीमध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. करोडो वेबसाईट आणि शेकडो माध्यमे असतानाही आपल्या सर्वांना आता एक समान संस्कृती आणि विचारांची जोपासना कशापद्धतीने करता येईल यासंदर्भातील मार्ग शोधण्याची गरज आहे,” असं ओबामा म्हणाले.

सोशल मीडियामुळे लोकं सत्य आणि आपल्या विचार यामध्ये गल्लत करत असल्याचेही ओबामा यांनी म्हटलं आहे. लोकांना सत्य म्हणजेच फॅक्ट आणि विचार यामध्ये फरक लक्षात घेणे काळाची गरज आहे असं सांगताना ओबामा यांनी, “प्रत्येकाला हव्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे. तुम्ही तुमची मतं नक्कीच मांडू शकता मात्र तुम्ही स्वत:चे फॅक्ट (सत्य) निर्माण करु शकत नाही,” असं म्हटलं आहे. सोशल मीडियाचा उलट परिणाम होत असला तरी या माध्यमातून लोकांना पूर्वीपेक्षा अधिक माहिती मिळत असल्याने ते अधिक सजग झाल्याचेही ओबामा यांनी म्हटलं आहे. आज ज्याप्रकारे सोशल मीडियामुळे लोकं दुरावली गेली आहेत त्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने वापरल्यास लोकांना माहिती देण्यासाठी त्याचा उत्तम माध्यम म्हणून उपयोग होऊ शकतो, असं मतही ओबामा यांनी व्यक्त केलं आहे.

“व्हर्चूअल जगामधील चर्चा आणि विषयांचे रुपांतर जेव्हा कृतीमध्ये आणि कामामध्ये होते तेव्हा त्याचा चांगला वापर करता येतो. या माध्यमांवरुन संवाद साधल्यानंतर तो प्रत्यक्षात साधून त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केल्यास ते फायद्याचे ठरते. यामुळे तुम्ही लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. कोणत्याही सीमांचे बंधन न ठेवता एखाद्या उद्देशासाठी गट निर्माण करण्यासाठी, लोकांना एकत्र आणण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडिया एक उत्तम माध्यम आहे असा माझा विश्वास आहे. मात्र त्याचवेळी व्हर्चूअल जग आणि खरं जग यामध्ये असणाऱ्या भिंती ओंडण्याची आपल्याला गरज आहे हे ही लक्षात घ्यायला हवं,” असं ओबामा यावेळी म्हणाले.