आपल्याला हवी तशी हेअरकट करुन घेणे हे एका अर्थाने खूप कठीण काम आहे. अनेकदा केस कापणारी व्यक्ती आपल्याला हवे तसे केस कापत नाही आणि मग आपला मूड ऑफ होतो. मात्र चीनमधील एका तरुणाला हेअरकटचा मजेशीर अनुभव आला. केस कापणाऱ्याने या तरुणाच्या डोक्यावर प्ले बटण कोरले आहे.

झालं असं की एका व्हिडीओमधील हेअरकट हवी असं त्याने केस कापणाऱ्या व्यक्तीला सांगितले. हेअरकटचा व्हिडीओ दाखवताना या तरुणाने व्हिडीओ पॉज केला. त्यावेळी पुन्हा व्हिडीओ प्ले करण्यासाठी जे बटण दिसते ते नेमके त्या व्हिडीओतील हेअरकटवर दिसत होते. त्यातच या मुलाने पॉज केलेला व्हिडीओ दाखवत ‘मला अशी हेअरकट हवी आहे’ असं सांगितलं. त्यामुळे ते प्ले बटण हे व्हिडीओवरील नसून हेअर कटचा भाग आहे असं केस कापणाऱ्या व्यक्तीला वाटल्याने त्याने मुलाच्या दोन्ही कानांच्यावर चक्क प्ले बटणाचा त्रिकोणी आकार कोरला आहे. हा सर्व प्रकार या तरुणानेच सोशल मिडियावरून शेअर केला आहे.

चीनमधील तॅन झी बोट या तरुणाने त्याच्याबरोबर घडलेला हा मजेशीर प्रकार वीबो या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. यावर अनेकांनी कमेन्ट करुन तॅनला घडलेल्या प्रकाराची आणखीन माहिती विचरली आहे.

 

त्या केस कापणाऱ्या व्यक्तीने मला ‘बटण हवे आहे का?’ असे विचारले होते असं तॅन म्हणाला. त्यावेळी मला काही समजले नाही पण मी हो उत्तर दिले होते. मात्र केस कापून झाल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसल्याचे त्याने सांगितले.

एकंदरितच काय तर या पुढे कधी तुम्ही व्हिडीओमधील हेअरकट हवीय असं सांगत असाल तर थोडे सतर्क राहा इतकचं.