पत्रकार म्हणून काम करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यातून एखादा कार्यक्रम लाईव्ह करायचा झाला तर किती जोखीम असते, हे वेगळ सांगायला नको. मागे नाही का ‘बीबीसी’च्या चालू कार्यक्रमात रॉबर्ट केली यांची लहान मुलं खेळता खेळता त्यांच्या कॉन्फरन्स रूममध्ये आली होती. या मुलांना त्यांच्या पत्नीने अक्षरश: खोलीतून खेचून बाहेर काढलं होतं. हा गंमतीशीर प्रकार साऱ्या जगाने पाहिला होता. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता बीबीसीच्या आणखी एका पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. पण कारण मात्र वेगळं आहे. चालू कार्यक्रमात रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेने त्याच्या पाठीत रट्टा लगावला. त्याने चुकीच्या ठिकाणी तिला स्पर्श केला होता.

बीबीसीचा पत्रकार बेन ब्राऊन राजकीय विश्लेषकांसोबत मिळून भर रस्त्यात लाइव्ह कार्यक्रम करत होता आणि त्यावेळेस ही घटना घडली. कार्यक्रम लाइव्ह असल्याने लाखो लोक ते पाहत होते. चालू कार्यक्रमादरम्यान रस्त्यावरून जाणारी एक महिला कॅमेरासमोर आली. आपण टिव्हीत दिसतोय हे लक्षात येताच तिने हातवारे करायला सुरूवात केली. तेव्हा कार्यक्रमात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या पत्रकाराने तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाला. तेव्हा रागावलेल्या महिलेने जाता जाता या पत्रकाराच्या पाठीत रट्टा दिला. पण इतकं होऊनही कमालीचा संयम ठेवत या पत्रकाराने जणू काही घडलंच नाही असं दाखवत आपला कार्यक्रम पूर्ण केला.
याची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. पण बेनने मात्र आपण तिला मुद्दामहून स्पर्श केला नसून, अनवधानाने स्पर्श झाल्याचे ट्विट करून सांगितले. विनाअडथळा कार्यक्रम पार पडावा एवढाच माझा हेतू असल्याचे सांगत दिलगिरीही व्यक्त केली.