बंगळुरूमधील पाच लहान मुलांना सोमवारी एका दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवण्यात आले होते. जीवघेण्या आजाराने त्रस्त असलेल्या या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी ‘मेक अ विश’ ही संस्था व शहर पोलीसांच्या संयुक्त विद्यमाने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मुलांना पोलिसांचा गणवेश परिधान करायला लावून अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवण्यात आले. एवढेच नाहीतर त्यांना सलामी देऊन त्यांचा सन्मानही केला गेला.

खरतर या सर्व मुलांची पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपली इच्छा पूर्ण झाल्याचे पाहून या मुलांना अतिशय आनंद झाल्याचे दिसत होते. याबाबत बंगळुरू पोलिसांनी ट्विट करून सांगितले की, आम्ही पाच मुलांचे एका दिवसासाठी पोलीस आयुक्त बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बंगळुरूचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी या मुलांकडे कार्यभार सोपवला होता. तसेच त्यांना दुर्धर आजारातून बरे होण्यासाठी प्रोत्साहनही दिले. पोलीस आयुक्तांनी या मुलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यास मोठी मदत केली.

‘मेक अ विश’ या खासगी संस्थेने या मुलांना सोमवारी पोलीस आयुक्तांसमोर आणले होते. या संस्थेकडून मुलांच्या आजाराबाबतही माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तत्काळ या खास कार्यक्रमासाठी परवानगी दिली होती. या पाच मुलांमध्ये एका मुलीचा व चार मुलांचा समावेश आहे. मुलांनी पोलीसांची वर्दी परिधान केल्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवण्यात आले. यावेळी मुलांना काही बनावट कागदपत्रांवर स्वाक्षरी देखील केली. यानंतर मुलांना श्वान पथकाबद्दल माहिती देण्यात आली व हातात शस्त्र देऊन त्यांचे फोटो देखील काढण्यात आले.