क्रिकेटच्या सामन्यादरम्यान पाऊस येणे किंवा एखादा प्राणी अचानक मैदानात शिरणे यांसारख्या घटना नेहमीच येतात. अशावेळी मॅच काही वेळासाठी थांबवली जाते. क्रिकेटचे मैदान सर्व दिशेने खुले असल्याने या आपत्ती आल्यावरच त्यावर उपाय करावा लागतो. परंतु क्रिकेटचा खेळ खेळताना एखादी भयंकर घटना घडली तर? क्रिकेटपटूंना आपला बचाव करण्यासाठी काय करावे काही सांगता येत नाही. नुकतीच अशी एक घटना घडली. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता मधमाशा अचानक वेगाने आल्याने आपला बचाव कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाल्यावर हे क्रिकेटवीर आणि पंच थेट मैदानावर पालथे झोपले.

 

त्यांचा सामन्यादरम्यान अचानक कराव्या लागलेल्या या कसरतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लाहोर व्हाईटस आणि पेशावर या दोन संघांमध्ये हा सामना रंगला होता. मधमाशा मैदानावर जवळपास १५ मिनिटांहून जास्त वेळ घोंगावत होत्या. सुरुवातीला अशाप्रकारे अचानक मधमाशा आल्याने काय करावे हे त्यांना कळत नव्हते. पण नंतर मैदानावर काही वेळ झोपून राहिल्यानंतर काही वेळात या मधमाशा निघून गेल्या. या सामन्यात लाहोर व्हाईटसने पेशावरला २७ धावांनी हरवले.

लाहोर संघाने नाणेफेक जिंकून निर्धारित २० षटकात ४ बाद १६३ धावा केल्या होत्या. यात कामरान अकमलने ४० चेंडूत ५२ धावांचे योगदान दिले. तर सलमान बट्टने ५८ चेंडूत ८५ धावांची दमदार खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पेशावरचा संघ १९.३ षटकात १३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. पेशावरच्या संघातील एकाही फलंदाजाला ३० धावांचा आकडा पार करता आला नाही. पेशावरकडून उमैद आसिफने ४ षटकात २६ धावा खर्च करुन दोन बळी मिळवले. तर हसन आदिल आणि आसिफ अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.