अनेक वेळा अगदी सामान्य वाटणारी व्यक्ती सोशल मीडियावर कशी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. आजवर याच सोशल मीडियावर व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्यामुळे अनेक जण रातोरात सेलिब्रिटी झाल्याची उदाहरणं आहेत. त्यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे रानू मंडल. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणं म्हणून उदनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांचं आयुष्य रातोरात बदललं. त्यांना संगीतकार-गायक हिमेश रेशमियासाठी गाणं म्हणण्याची संधी मिळाली. तेव्हापासून त्या सतत प्रकाशझोतामध्ये येत आहेत. हिमेश रेशमियामुळे रानू मंडल यांनी रेल्वे स्टेशन ते म्युझिक स्टुडिओपर्यंतचा प्रवास केला . मात्र त्यांच्या आधी रेल्वे स्टेशनवर असंच गाणं म्हणणाऱ्या एका १३ वर्ष मुलीनेदेखील एका बॉलिवूड चित्रपटासाठी गाणं म्हटलं आहे.

अनुराग कश्यप यांच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटासाठी दुर्गा या १३ वर्षीय मुलीने आपला आवाज दिला आहे. या चित्रपटातील ‘मेरा जूता फेक लेदर’ हे गाणं दुर्गाने गायलं आहे. विशेष म्हणजे रानू मंडल यांच्याप्रमाणेच दुर्गादेखील रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये गाणी गात कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

एकदा फट फिश रेकॉर्ड्सचे आनंद सुरापूर यांनी दुर्गाला गातांना तिचा आवाज ऐकला. तिच्या आवाजामुळे प्रभावित झालेल्या आनंद यांनी तिला संगीत दिग्दर्शक स्नेहा खनवालकरकडे ऑडिशनसाठी पाठविलं. त्यानंतर दुर्गाचं नशीब पालटून गेलं. स्नेहा यांना दुर्गाचा आवाज ‘मेरा जूता फेक लेदर’ या गाण्यासाठी योग्य वाटला आणि त्यांनी तिला अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’मध्ये गाण्याची संधी दिली. विशेष म्हणजे दुर्गाने गायलेलं हे गाणं चांगलचं प्रसिद्ध झालं.

दुर्गा

दरम्यान, दुर्गा आंध्रप्रदेशमधील रहिवासी असून ती कधीही हिंदी गाणी ऐकत नाही. परंतु तिला उत्तमरित्या हिंदी बोलता येतं. त्यामुळेच तिने स्नेहाच्या मार्गदर्शनाखाली आपलं टॅलेन्ट सर्वांसमोर आणलं. मात्र या गाण्यानंतरही ती फार काही प्रकाशझोतात आली नाही.