भीक मागणारा एक मुलगा गर्दीच्या ठिकाणी घोळक्याने बसलेल्या तरुण-तरुणींजवळ जाऊन भीक मागतो. त्याला कोणीच भीक देत नाही, अशातच तो घोळक्यातील एका तरुणाच्या हातातील गिटार मागतो. त्याचे हे वागणे पाहून सर्वजण त्याची खिल्ली उडवतात. या गिटारचे तू काय करणार अशा अवेशात भिकारी मुलाला गिटार दिले जाते. त्यानंतर जे काही घडते, ते पाहून उपस्थित तरुणांना आश्चर्याचा धक्का बसतो.

गिटार हातात येताच त्या भिकारी मुलाची बोटे सफाईदारपणे गिटारवरून फिरायला लागतात आणि गिटारमधून सुमधूर धून वाजू लागते. काही वेळापूर्वी त्याची खिल्ली उडविणारे आता मात्र मंत्रमुग्ध झालेले असतात. तो मुलगा केवळ गिटार वाजवून थांबत नाही, तर गाणेदेखील गातो. जेव्हा तो इंग्लिश गाणे गातो, तेव्हा खरी गंमत होते. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला पॉप सिंगर जस्टिन बिबरचे इंग्लिश गाणे तो गातो. हा सर्व प्रकार पाहून अचंबित झालेले सर्वजण भारावलेल्या वातावरणात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. हा एक प्रँक असल्याचे गुपित अखेरीस उघड करण्यात येते आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

यूट्युबवर हा व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय झाला आहे. अनेकांनी त्या गिटार वादकाचे कौतुक केले आहे. धोपट मार्गाचा अवलंब न करणाऱ्यांसाठी यूट्युब हा एक उत्तम मंच आहे. येथे प्रतिभावंतांना अल्पावधीत लोकप्रियता प्राप्त होते. यूट्युबचे हेच वैशिष्ट्य आहे. अनेकप्रकारचे व्हिडिओ येथे पाहायला मिळतात. ‘प्रँक’ हा असाच एक लोकप्रिय प्रकार आहे. वर उलेल्ख केलेला व्हिडिओदेखील याच प्रकारातील आहे. अनेकवेळा केवळ रुपावरून एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक मत बनविले जाते. परंतू दुसरी बाजू पुढे येताच चित्र पालटते. या व्हिडिओदेखील हेच पाहायला मिळते. व्हिडिओमधील तरुणाचे गायन आणि गिटार वादन तुम्हला नक्कीच सुखद अनुभव देईल.