गणित हा काही लोकांचा जितका आवडता विषय आहे, तितकाच तो काही लोकांचा नावडता विषयसुद्धा आहे. पण याच गणिताचा सिगारेटच्या व्यसनाशी काही संबंध आहे असं म्हटल्यास तुमचा विश्वास बसेल का? पण एका अभ्यासाने गणित आणि सिगारेटचं व्यसन यांचा थेट संबंध जोडला आहे. ज्यांचं गणित चांगलं आहे, असे लोक सिगारेटचं व्यसन लवकर सोडू शकतात, असं या अभ्यासातून निदर्शनास आलंय.

हेल्थ सायकोलॉजी जर्नलमध्ये ऑनलाइन प्रकाशित झालेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, गणिताच्या परीक्षेत ज्या लोकांना चांगले गुण मिळतात किंवा जे लोक गणितात पक्के आहेत असे लोक इतरांच्या तुलनेत लवकर सिगारेटचं व्यसन सोडू शकतात. या लोकांची स्मरणशक्ती चांगली असते आणि त्यांचं गणित चांगलं असतं म्हणून हे लोक सिगारेटमुळे होणारा धोका लवकर समजू शकतात, पर्यायाने व्यसनही लवकर सोडू शकतात असं त्यात नमूद केलंय.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीचे ब्रिटनी शूट्स-रेनहार्ड यांनी म्हटलं की, “ज्यांचं गणित चांगलं आहे ते लोक सिगारेट व्यसनाशी संबंधित असलेल्या धोक्याची संख्या पटकन लक्षात ठेवू शकतात असं आमच्या अभ्यासात दिसून आलंय. त्यामुळेच इतरांच्या तुलनेत ते वेगळे ठरतात.”

या अभ्यासाबाबत त्यांनी पुढे सांगितलं, “अमेरिकेतील ६९६ लोकांनी या संशोधनात सहभाग घेतला. सिगारेटचं व्यसन असलेल्या या लोकांना संख्या मोजण्याची एक छोटी परीक्षा दिली गेली. त्यांना चार वेगवेगळ्या धोक्याची सूचना असलेले सिगारेट चार वेळा दाखवले गेले. सिगारेटमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची माहिती त्यावर होती. प्रत्येक सूचनेशी निगडीत त्यांची भावनिक प्रतिक्रिया, विश्वासार्हता आणि वैयक्तिक अनुभव यांची रेटिंग नोंदवली गेली.”

सहा आठवड्यांनंतर त्याच ६९६ लोकांना सिगारेट व्यसनाच्या धोक्याशी संबंधित किती माहिती लक्षात आहे हे विचारण्यात आलं. पुढील तीस दिवस ते एका वर्षात ते सिगारेटचं व्यसन कितपत सोडू इच्छितात याचीही माहिती घेण्यात आली. परीक्षेदरम्यान ज्या लोकांनी आकड्यांशी संबंधित योग्य माहिती देऊन अधिक गुण मिळवले होते, ज्यांची स्मरणशक्ती चांगली होती अशा लोकांना सिगारेटमुळे होणारा धोका चांगलाच लक्षात राहिला आणि त्यांनी सिगारेटचं व्यसन सोडण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली.