हौसेला मोल नाही.. किंवा हा छंद जिवाला लावी पिसे या म्हणी तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. मात्र या प्रत्यक्षात आल्या तर? हिमाचल प्रदेशातील एका खासगी कंपनीने ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवली आहे. येथील एका कंपनीने ६० हजार रुपयांच्या स्कुटीसाठी म्हणजेच दुचाकीसाठी व्हिआयपी नंबर प्लेट घेतली. त्यासाठी एक दोन नाही तब्बल १८ लाख रुपये मोजले आहेत. HP 90-0009 हा तो क्रमांक आहे ज्यासाठी १ दोन नाही तर १८ लाखांची बोली लागली.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार हिमाचल प्रदेशातील राहुल पॅम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक स्कुटी घेतली. या स्कुटीसाठी या कंपनीला एक खास व्हिआयपी नंबर हवा होता. यासाठी कंपनीने व्हिआयपी नंबर्ससाठी होणाऱ्या ऑनलाइन लिलावात भाग घेतला. फक्त भागच घेतला नाही तर दुचाकीच्या नंबरसाठी सर्वात जास्त बोली लावत १८ लाखांना हा नंबर विकत घेतला. मागच्या शनिवारी हा लिलाव सुरु झाला, जो या शुक्रवारी संपला.

राहुल पॅम या कंपनीने १८ लाख २२ हजार ५०० रुपये मोजून व्हिआयपी नंबर घेतला. आता ही रक्कम कंपनीला तीन दिवसांच्या आता एसडीएम कार्यालयात भरायची आहे ज्यानंतर हा व्हिआयपी नंबर त्यांच्या स्कुटीला लावता येणार आहे. काही लोकांनी या व्हिआयपी नंबरसाठी १० ते १५ लाखांचीही बोली लावली होती. राज्य सरकारतर्फे व्हिआयपी नंबरसाठी गेल्या आठवड्यात कितीही मोठी बोली लावण्याची सूट देण्यात आली होती.