इंग्लंड येथे सुरू असलेल्या विश्वचषकाचा रणसंग्राम सध्या अंतिम टप्यात पोहचला आहे. जगभरातील क्रिडाप्रेमींचे विश्वविजेत्याकडे लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यांपासून उपांत्य फेरीतील सामन्याला सुरूवात होणार आहे. अशातच एका भारतीयाने अवघ्या दीड सेंटीमीटरचा सोन्याचा वर्ल्डकप तयार केला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याची जोरदार चर्चा आहे.

बंगळुरूमधील नागराज रेवांकर या सोनाराने हा करिष्मा केला आहे. नागराज रेवांकर यांनी विश्वचषकाची मिनिएचर (सर्वात छोटी) ट्रॉफी तयार केली आहे. याची लांबी फक्त १.५ सेंटीमीटर आहे. तर वजन ०.४९ ग्राम ऐवढं आहे.

नागराज रेवांकर यांनी बुधवारी या मायक्रो विश्वचषकाला लोकांसमोर आणले. ‘भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विराट अॅण्ड कंपनीला पाठिंबा देण्यासाठी हा वर्ल्डकप तयार केल्याचे रेवांकर यांनी सांगितले.’ वर्ल्डकपची ट्रॉफी ऐवढी छोटी आहे की बोटावर ठेवता येते. जर चुकून ट्रॉफी खाली पडल्यास एका नजरेत शोधण कठीण जाईल.

सोशल मीडियावर या छोट्या ट्रॉफीची चांगलीच चर्चा आहे. नेटकरी नागराज रेवांकर यांच्यावर कौतुकांची थाप टाकत आहेत. तर काहीजणांनी फिरकी घेत हा विश्वकप पाकिस्तानला द्या असा सल्ला दिला आहे.