गेल्या आठवड्यात बेंगळुरूमध्ये ऑर्डर रद्द केल्यामुळे तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपावरुन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयला अटक करण्यात आली, त्याला गुरुवारी सशर्त जामीन मंजूर झाला. पण आता या प्रकरणात एक नवं वळण आलंय.

डिलिव्हरी बॉय कामराजने आता त्याच्यावर आरोप करणाऱ्या मॉडेल आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर हितेशा चंद्रानी हिच्यावरच उलट आरोप केलेत. शिवाय त्याने स्वतःवरील सर्व आरोप नाकारले. कामराजच्या तक्रारीनंतर बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस स्थानकात हितेशाविरोधात आयपीसी कलम 355 (हल्ला), 504 (अपमान) आणि 506 ( धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा- मला वाटतं तो व्यक्ती निर्दोष आहे; झोमॅटो प्रकरणावर परिणितीचे ट्वीट व्हायरल


काय आहे कामराजचा आरोप?
पहिल्यांदा हितेशानेच मला शिव्या दिल्या आणि चपलेने मारलं असा आरोप कामराजने केला आहे. ट्रॅफिकमुळे डिलिव्हरी करण्यास थोडा उशीर झाला होता, त्यामुळे मी त्यांची माफी मागितली. पण त्या खूप रागात होत्या. त्यावर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे मला उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी डिलिव्हरीचे पैसै देण्यास नकार दिला आणि झोमेटॉच्या कस्टमर केअरसोबत बोलत असल्याचं सांगितलं. या दरम्यान झोमॅटो सपोर्ट स्टाफने त्यांची ऑर्डर रद्द केल्याचं मला समजलं. त्यावर मी त्यांच्याकडून ऑर्डर परत मागितली पण त्यांनी सहकार्य केलं नाही. अखेर मी ऑर्डर न घेता इमारतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी त्यांनी मला चप्पलेने मारायला सुरूवात केली. मी स्वतःचा बचाव करत होतो, पण त्यावेळी मला मारण्याच्या नादात हितेशा यांच्या हातातील अंगठी त्यांच्याच नाकावर लागली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. असा आरोप कामराजने केला आहे.

आणखी वाचा- ऑर्डर रद्द केली म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेचं नाकच फोडलं; रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ केला पोस्ट

दरम्यान, या घटनेनंतर हितेशाने व्हिडिओ शेअर करुन ऑर्डर कॅन्सल केल्याच्या रागातून झॉमेटॉच्या डिलिव्हरी बॉयने मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली. नंतर झोमॅटोनेही या घटनेची गंभीर दखल घेत हितेशाची माफी मागितली आणि डिलिव्हरी बॉयचं तात्पुरतं निलंबन करत असल्याचं जाहीर केलं. पण, आता डिलिव्हरी बॉयने केलेल्या आरोपांनंतर या घटनेला वेगळं वळण आलं आहे.