नोटाबंदीचा निर्णय जाहिर झाल्यानंतर प्रत्येकाला काही ना काही त्रास सहन करावा लागत आहे. कोणाला पैसे बदलून घेण्यासाठी बँका आणि एटीएमच्या बाहेर तासन् तास उभे राहावे लागत आहेत तर कोणाला पैसे सुटे करुन घेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पण हा सगळा त्रास जर बाजूला ठेवला तर यातून पैशांची बचत झाली असा विचार तुम्ही केला आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहिर केला. या निर्णयानंतर ५०० आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यात आणि त्याजागी नव्या पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा आल्या. पण आपल्याकडचे जूने पैसे बदलून घेण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिकांनी बँकेबाहेर तासन् तास रांग लावली. हा नाहक त्रास सहन करण्याचा एक मुद्दा बाजूला ठेवला तर यातून आपले अनेक वायफळ खर्च कमी झाले असल्याचे तुमच्याही लक्षात येईल.

पगार बचत : नोटाबंदीचा निर्यण जाहीर झाल्याने अनेकांचा पगार अद्यापही बँकेत तसाच असेल. अनेक ठिकाणी एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घातल्याने अनेकांना ऑक्टोबर महिन्याचा पगार खर्चता आला नाही, त्यामुळे पगारात बचत झाली.
खरेदीचा खर्च वाचला : ज्यांना वरचे वर खरेदी करण्याची आवड आहे अशांचीही खरेदी कमी झाली. काही ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट कार्डने बील भरले जाते. पण ,स्ट्रीट शॉपिंग करताना सुट्या पैशांचा तुटवडा किंवा पैसेच नसल्याने खरेदीचाही खर्च वाचला.
चित्रपटावरचा खर्च वाचला: नोटांबदीच्या निर्णयानंतर अनेकांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली आहे. कारण याचा फटका निर्मात्यांनाही बसला आहे. साहाजिक महिन्यातून एक दोनदा चित्रपटावर खर्च होणारे किमान एक दोन हजार रुपयेही वाचलेत.
हॉटेलिंगचा खर्च कमी झाला : नोटाबंदीच्या निर्णयानंतर हॉटेलिंगवर होणारा खर्चही कमी झाला आहे. बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत त्यामुळे या गोष्टींवरही खर्च कमी झाल्याचे आढळून आले आहे.