‘ओरडेल त्याची मातीही विकली जाते अन् गप्प बसेल त्याचे सोनेही खपत नाही’ मार्केटिंगचा हा साधा फंडा आहे. आपल्या उत्पादनात काही दम नसला तरी चालेल पण त्याचे मार्केटिंग उत्तम जमले की उत्पादन असे चुटकीसरशी बाजारात विकले जाते. हा फंडा सरसकट सगळीकडेच लागू होतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे तैवान. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तैवानच्या रस्त्यावरील काही फोटोंची जास्त चर्चा होत आहे. काही मुली अत्यंत तोकडे कपडे घालून रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत. या फोटोंकडे पाहिले तर बघणारे अनेक जण या ‘त्या’ मुली असतील असा अंदाज बांधून मोकळे होतील. पण असा विचार करण्याआधी या मुली कोण आहे हे समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. या मुली ‘बिटल नट गर्ल्स’ म्हणून ओळखल्या जातात आणि ग्राहकांना फक्त सुपारी विकणे इतकेच त्यांचे काम असते. तैवानमध्ये सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तैवानमधले हे दुस-या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाणारे पीक आहे. त्यामुळे साहजिकच ज्या पिकाचे सर्वाधिक उत्पन्न होते तो माल बाजारात विकायचा तरी कसा हा प्रश्न विक्रेत्यांना असतो त्यामुळे अशाप्रकारे मार्केटिंगचे फंडे वापरले जातात.