मार्च महिन्यापासून देशभरामध्ये करोनासंदर्भातील शेकडो बातम्या वाचायला आणि पहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासूनच तर देशभरात आढळून येणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. करोना काळामध्ये शारीरिक तसेच या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ताण तणावामुळे मानसिक आजारांचाही समाना करावा लागत आहे. दिवसोंदिवस करोनाच्या संकटाचे गांभीर्य वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे. एकीकडे असे चित्र असतानाच दुसरीकडे मात्र काहीजणांना या विषयाचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये उघडकीस आला आहे.

नक्की पाहा >> ऑक्सफर्डची करोना लस: जाणून घ्या नाव, किंमत आणि लसीकरणासंदर्भात

भोपाळमधील चिरायू हॉस्पिटलमधील करोनाबाधित रुग्णांनी चक्क रुग्णालयाच्या गच्चीवर जाऊन एकत्र डान्स केल्याची माहिती समोर आली आहे. या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती, “पाहा… हे करोना पॉझिटिव्ह आहेत. काही करोना वरोना नाहीय,” असं म्हणत असल्याचे ऐकू येत आहे. या व्हिडिओमधील अनेकजण हे हसत हसत नाचताना दिसत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे या करोनाबाधित रुग्णांमध्ये एक ६० वर्षीय व्यक्ती आणि एक महिला असल्याचेही दिसून येत आहे. हे दोघेही टाळ्या वाजवत नाचताना दिसत आहे. “ही ६० वर्षांची व्यक्ती एकदम मस्त आहे. सर्वजण आपल्या नाचण्यात दंग आहेत,” असं व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती सांगत असल्याचे व्हायरल क्लिपमध्ये ऐकू येते.

नक्की वाचा >> …तर पर्यटनासाठी आलेल्या परदेशी नागरिकांना ‘हा’ देश देणार दोन लाखांहून अधिक निधी

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रुग्णालयाचे संचालक अजय गोएंका यांनी प्रतिक्रिया देताना कोणालाही रुग्णालयाच्याबाहेर किंवा गच्चीवर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गच्चीवर जाऊन नाचणाऱ्या रुग्णांनी कुलूप तोडून गच्चीत प्रवेश केल्याचेही गोएंका यांनी म्हटलं आहे. चौथ्या मजल्यावरील गेटचे कुलूप तोडून हे लोकं वर गच्चीवर केल्याचा आरोप संचालकांनी केला आहे.