भारतात सध्या UPI ट्रान्झॅक्शन सवयीचा भाग बनला आहे. कोणत्याही बँकेचे अकाऊंट असेल तरी कोणत्याही अॅपच्या माध्यमातून UPI ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ऑनलाईन पेमेंट प्रकारावर लोकांचा जास्त भर असल्याचं दिसू लागलं आहे. त्यातही UPI पेमेंटला लोकांची अधिक पसंती आहे. पण, UPIद्वारे पैसे पाठवणाऱ्यांसाठी सध्या एक चिंतेची बाब म्हणजे १ जानेवारीपासून UPI ट्रान्झॅक्शनच्या नियमात एक बदल होण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून UPI पेमेंटवर शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती आहे. हा नियम केवळ थर्ड पार्टी अॅपसाठी लागू असणार आहे. स्वत:ची पेमेंट बँक नसलेले अॅप म्हणजेच फोन पे, गुगल पे, अॅमेझॉन पे यांसारख्या थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून जर UPI ट्रान्झॅक्शन करण्यात आले तर त्याचे शुल्क भरावे लागणार असल्याची तरतूद करण्याचा विचार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) करत आहे. याचसोबत, NPCI ने थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचाही निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबाबत NPCIने सांगितले की, सध्या UPI वरून पैसे पाठवणाऱ्यांची संख्या महिन्याला सुमारे २०० कोटी इतकी आहे. थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अॅपची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि निकोप स्पर्धेसाठी NPCIने हा निर्णय घेतला आहे. NPCIच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रान्झॅक्शनमध्ये कोणत्याही एकाच अॅपची मक्तेदारी न राहणार नाही. तसेच, गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे यांसारख्या कंपन्या आता UPIअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये जास्तीत जास्त ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.
गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे यांसारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. मात्र या नियमाचा परिणाम ‘पेटीएम’च्या ग्राहकांवर मात्र होणार नाही. UPI ट्रान्झॅक्शनसाठीचे लावले जाणारे शुल्क हे ‘पेटीएम’ला लागणार नाही. कारण पेटीएम पेमेंट बँक स्वरूपात अस्तित्वात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 6, 2020 1:40 pm