पाटणा विद्यापीठाचे वादग्रस्त प्रोफेसर ‘लव्ह गुरु’ मटुकनाथ चौधरी आता एकटे पडले आहे. जिच्यासाठी पत्नीशी प्रतारणा केली तिच त्यांना सोडून अध्यात्मच्या मार्गावर निघून गेली आहे. ज्यूली कुमारी नावाच्या विद्यार्थीनीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्या कारणाने ६४ वर्षीय मटुकनाथ चर्चेत होते. त्यांचे विद्यार्थीनीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबध असल्याचं समजताच त्यांच्या पत्नीनं साधरण बारा वर्षांपूर्वी त्यांना घराबाहेर काढलं होतं.

काही वर्षांपूर्वी पत्नीने पत्रकारांसोबत घरावर धाड टाकत मटुकनाथ यांना त्यांच्या माजी विद्यार्थिनीसोबत रंगेहाथ पकडलं होतं. यानंतर मटुकनाथ यांनी जाहीरपणे आपलं प्रेमप्रकरण मान्य केलं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर नातेवाईक आणि काहीजणांनी मिळून मटुकनाथ यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं होतं. कॉलेजनंही त्यांना काढून टाकलं होतं. मटुकनाथ लहान विद्यार्थीनींना गुणांचं आमिश दाखवून त्यांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

आपली प्रेयसी ज्यूलीसोबत मटुकनाथ घराच्यांपासून विभक्त राहत होते. पण, ज्यूलीनं आता संसारात न रमता अध्यात्मच्या मार्गावर चालण्याचं ठरवलं आहे. शांतीच्या शोधात ज्यूली ऋषीकेश, पुद्दुचेरी किंवा पुण्यातील ओशोंच्या आश्रमात असते. तिनं जो मार्ग निवडला त्याला माझा विरोध नाही. वयाचा आमच्या प्रेमात कधीच अडसर आलेला नाही. अध्यात्मच्या मार्गावर तिचं सुख आहे आणि माझा तिला पाठिंबा आहे असं मटुकनाथ ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

ज्यूलीनं स्वत:ला पूर्णपणे अध्यात्मात वाहून घेतलं आहे तिला जेव्हा यातून वेळ मिळेल तेव्हा ती मला भेटायला येईल असंही मटुकनाथ म्हणाले. पाटणा येथील घरात मटुकनाथ सध्या एकटेच राहत आहे. यावर्षी ते पाटणा विद्यापीठातून निवृत्त होत आहे. निवृत्तीनंतर ‘प्रेम पाठशाला’ काढण्याचा त्यांचा मानस आहे. येथे आपण विद्यार्थ्यांना प्रेमाची शिकवण देणार असंही ते म्हणाले. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात मटुकनाथ यांनी आपल्या आणि पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेत यापुढे अखेरपर्यंत पगारातील एक तृतीयांश भाग तिला देण्याचं आश्वासन दिलं.

२०१४ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने मटुकनाथ यांना पत्नीला देखभालीसाठी २५ हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. तसंच २००७ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्या कारणाने १८.५ लाख रुपये देण्याचाही आदेश दिला होता. यानंतर मटुकनाथ यांनी पटना उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यांची याचिका रद्द करण्यात आली होती. अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. २००७ मध्ये आपला पगार ३५ हजार रुपये होता आणि न्यायालयाने पत्नीला देण्यासाठी सांगितलेली रक्कम मोठी होती असा दावा त्यांनी केला होता. तसंच घरातून बाहेर काढल्यानंतर आपण नवीन घर घेतलं ज्यासाठी ५० हजारंचा हफ्ता फेडत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण सध्या मटुकनाथ यांचा पगार १.८ लाख आहे त्यामुळे पत्नीला खर्चासाठी पैसे देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे.