सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत आहे. अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वचजण मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियापासून ते सभांपर्यंत अनेक गोष्टींचा आधार घेत आहेत. यंदाची बिहार निवडणूक ही सोशल मीडियाचा सर्वाधिक प्रभाव असणारी निवडणूक ठरणार आहे. त्यामुळेच प्रत्यक्षात प्रचाराबरोबरच डिजिटल प्रचारावरही भर देण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र त्याचवेळी सोशल नेटवर्किंगवर सध्या बिहारमध्ये चर्चा आहे ती नेहा सिंग राठोड या तरुणीची. नेहाचे नाव चर्चेत असण्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर सध्या तिचं व्हायरल होणारं ‘ला सुना जवाब… का बा बिहार में?’, हे गाणं.

नेहा ही भोजपुरी भाषेमध्ये गाणी लिहिती आणि सादर करते. धरोहर नावाचे तिचे युट्यूब चॅनेल आहे. मध्यंतरी तीने बिहारमध्ये काय आहे हे सांगणारं गाणं स्वत: लिहिलं आणि खास बिहारमधील लोककलाकारांप्रमाणे सादर केलं. या गाण्यामध्ये तिने बिहारमधील आरोग्य व्यवस्थेपासून ते जनतेऐवजी नेत्यांना खुर्ची महत्वाची असण्यापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण्यांना चिमटे काढले आहेत. नेहाच्या ट्विटर टाइमलाइनवर गेल्यावर तिच्या या गाण्यावरील प्रतिक्रिया आणि मुलाखतींच्या लिंक पहायला मिळतील. नेहाने आरसा दाखवल्याने बिहारमधील सत्ताधारी पक्षाचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपाचे समर्थक तिच्यावर संतापले असून आता अनेकजण नेहाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. नेहाप्रमाणे इतरही कलाकारांनी आता लोक कलेमधून राजकारण्यांना अगदी वेगवेगळ्या शैलीमध्ये आरसा दाखवण्यास सुरुवात केलीय. भाजपाने बिहार निवडणुकीसाठी बिहार मे का बा नावाचं गाणं तयार केलं आहे. यामध्ये बिहारमधील परिस्थिती सुधारली असून बराच विकास झाला आहे असा प्रचार भाजपाने केला आहे. मात्र आता ला सुना जवाब म्हणत नेहाने बिहारमध्ये खरी परिस्थिती काय आहे हे आपल्या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न केलाय.

सध्या सोशल मीडियावर गाजणाऱ्या ‘ला सुना जवाब… का बा बिहार में?’ म्हणजेच बिहारमध्ये काय आहे ऐका असं सांगणारं नेहाचं गाणं चर्चेत आहे. नेहाने केवळ ढोलकीच्या तालावर गायलेल्या या गाण्यात बिहारमधील रुग्णालयांमध्ये कर्माचाऱ्यांचा तुटवडा आहे, स्वच्छता नाही, रुग्णवाहिका नाही, व्हेंटीलेटर्स नाहीत हे अगदी क्रिएटीव्ह पद्धतीने सांगितलं आहे. पुढे याच गाण्यात तिने राजकारण्यांना जनतेशी काही घेणं देणं नसून त्यांना खुर्चीच महत्वाची असते असा टोलाही लगावला आहे. १५ ऑक्टोबर रोजी नेहाने स्वत:च्या या गाण्याची एक मिनिट ३६ सेकंदांचा व्हिडीओ पोस्ट केलाय. हा व्हिडीओ सात हजार ८०० हून अधिक वेळा शेअर झाला आहे. तर ३१ हजारहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे. या व्हिडीओला तीन लाख ८४ हजारहून अधिक व्ह्यूज आहेत.

मला विरोध करण्याचा हक्क लोकशाहीने दिला आहे तो मी वापरत आहे असं नेहाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. तर अन्य एका ट्विटमध्ये तिने प्रत्येकाला सरकारची बाजू किंवा जनतेची बाजू निवडण्याचा हक्क असतो मी माझा निर्णय घेतला असून त्याचा सन्मान केला जावा असं आवाहन विरोधकांना केलं आहे.