ऑनलाइन बॅटल गेम फ्री-फायरवरुन एका 14 वर्षांच्या मुलाची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा मिटवण्यासाठी मित्राचा मृतदेह नदीत फेकला होता. बिहारच्या गोपाळगंज परिसरात ही घटना घडली आहे.

रोशन अली असं 14 वर्षीय मृत मुलाचं नाव असून तो 11 वीचा विद्यार्थी होता. तो 1 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता, तशी तक्रार त्याच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकात केली होती. 1 फेब्रुवारी रोजी तीन मित्रांनीच त्याची हत्या केली आणि मृतदेह गंडक नदीत फेकला. घटनेच्या आठ दिवसांनी पोलिसांनी नदीतून त्याचा मृतदेह हस्तगत केला असून रोशनच्या तीन मित्रांना अटक करण्यात आली आहे.

कुटुंबियांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी रोशनच्या तीन मित्रांना संशयाच्या बळावर ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर रोशनची हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली. तसेच मृतदेह गंडक नदीत फेकल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवून रोशनचा मृतदेह नदीतून बाहेर काढला.

फ्री फायर गेम खेळताना झालेला वाद हत्येसाठी कारणीभूत ठरल्याचं स्थानिक पोलीस अधिकारी नरेश पासवान यांनी सांगितलं. फ्री फायरमधील रँक गेममध्ये रोशन त्याच्या मित्रांपासून बराच पुढे निघून गेला होता. गेममध्ये रोशनचा रँक वाढला आणि आपण मागे राहिल्याच्या रागातून तिघा मित्रांनी त्याची हत्या केली आणि मृतदेह पाण्यात फेकला, अशी माहिती पासवान यांनी दिली.