जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असणारे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांच्याविरोधात सध्या एक चर्चा सुरु आहे. करोना विषाणूची साथ पसरण्यासाठी गेट्स जबाबदार असल्याचा आरोप काही लोकांकडून केला जात आहे. अमेरिकेमध्ये कॉन्सपिरसी थेअरिस्ट म्हणजेच कट सिद्धांत मांडणाऱ्या काही लोकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन हे आरोप केले आहेत.

“सोशल मिडिया आणि महामारी हे दोन्ही एकत्र येणं हे एक चुकीचं समीकरण असून लोकांना अगदी साध्या साध्या गोष्टींचेही स्पष्टीकरण अपेक्षित असतं,” असं गेट्स यांनी सीएनएन टाऊन हॉलच्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. बिल गेट्स यांच्या करोनासंदर्भातील भूमिकेबद्दल शंका निर्माण करणारे आणि वादग्रस्त वक्तव्य असणारी खोट माहिती सोशल नेटवर्किंगवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जात आहे. सोशल नेटवर्किंगबरोबरच मेसेजिंग अॅप आणि इतर माध्यमांमधूनही गेट्स यांच्याबद्दल अपप्रचार केला जात आहे. जगभरातील अनेक भाषांमध्ये गेट्स आणि करोना महामारीसंदर्भातील मजकूर व्हायरल करण्यात येत असल्यासंदर्भात वक्तव्य करताना गेट्स यांनी नाराजी व्यक्त केली.

नक्की वाचा >> करोनावर मात करुन अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करायची असेल तर…; बिल गेट्स यांचा सल्ला

तो व्हिडिओही होतोय व्हायरल

गेट्स यांच्यावर आरोप करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गेट्स यांना जगातील १५ टक्के लोकसंख्या संपवायची असून त्यांना लोकांमध्ये मायक्रोचीपचा प्रयोग करायाच असल्याचा दावा करण्यात आला आहे. युट्यूबवर या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत.

गेट्स म्हणतात…

“करोनाची लस गरजूंपर्यंत पोहचण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आमच्या फाउंडेशनने इतर कोणत्याही संस्थेपेक्षा अधिक निधी दिला आहे.,” असं गेट्स यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं. करोनाविरुद्धच्या लढाईसाठी २५० मिलियन डॉलरची मदत करण्याचा निर्णय बिल गेट्स यांनी घेतला आहे. मागील २० वर्षांपासून अनेक विकसनशील देशांमध्ये आरोग्यासंदर्भातील कामांसाठी हजारो कोटी रुपये बिल गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून खर्च करण्यात आले आहे. “या सर्व कामाकडे दूर्लक्ष करुन आता लोकांना मारण्याचा आमचा डाव आहे किंवा त्यांना बाधा होईल असं काहीतरी करण्याचा आमचा विचार असल्याचे सांगितलं जात आहे. किमान आम्ही करोना लसीसंदर्भात काम करतोय हे तरी यामधून मान्य करण्यात आलं आहे. मात्र यासंदर्भातील माहिती उलट सुलटं पद्धतीने सांगितली जात आहे,” असं गेट्स मुलाखतीमध्ये म्हणाले.

नक्की पाहा >> Video : मास्क लावल्यावर चष्म्यावर बाष्प जमा होतेय?; ट्राय करा ‘या’ तीन सोप्या ट्रीक्स

फॅक्ट चेक म्हणतं…

बिल गेट्स यांच्याविरोधात अपप्रचार करणारे अनेक दावे आणि माहिती खोटी असल्याचे एएफपीच्या फॅक्ट चेकमधून समोर आली आहे. यामध्ये अगदी फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामवर शेअर होणाऱ्या अनेक पोस्टमधील माहिती खोटी असल्याचे उघड झाले असून अफवा पसरवण्यासाठी हे केलं जात असल्याचं सत्य समोर आलं आहे. ही खोटी माहिती इंग्रजीबरोबरच फ्रेंच, स्पॅनिश, पॉलिश भाषेमध्येही व्हायरल केली जात आहे.

काय काय होतं आहे व्हायरल?

बिल गेट्स यांना जैविक दहशतवादासाठी अटक करण्यात आल्यापासून ते आफ्रिकन लोकांना विषबाधा घडवण्याचा गेट्स यांचा डाव असल्यासंदर्भातील अनेक पोस्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्या आहेत. “खरं नेहमी जगासमोर येतं यावर माझा विश्वास आहे,” असं गेट्स सीएनएनशी बोलताना म्हणाले आहेत.

धक्कादायक बातमी >> हृदयद्रावक… रुग्णालयाच्या खिडकीमधूनच त्याने घेतले आईचे अंत्यदर्शन

गेट्स यांना अशाप्रकारे पहिल्यांदाच टार्गेट करण्यात आलेलं नाही. यापूर्वी झिका विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता त्यावेळी म्हणजेच २०१५ मध्येही त्यांच्यावर ब्राझीलमध्ये हा विषाणू पसरवण्यासंदर्भातील कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलं होता.