वाढदिवस म्हटला की सेलिब्रेशन आलेच. मग अगदी लहापणी चिमुकल्यांसोबत फुग्यांच्या बरोबरीने केलेले असो किंवा मोठेपणी आदल्या दिवशी रात्री १२ वाजता केक कापून केलेले असो. या दिवसाचे कौतुक काही खासच असते. हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करणे, गिफ्टसचा पडणारा पाऊस आणि केक यांनी साजरा होणारा वय कितीही असले तरी सर्वांसाठीच खास असतो. आता माणसांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे ठिक आहे हो. पण म्हशीचाही वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. हो, तुम्ही वाचताय ते बरोबर आहे. महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये एका म्हशीचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेला.

या म्हशीचे नाव नाजुका असे असून बुलढाण्यातील दुब्बल परिवारातर्फे तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या म्हशीला वाढदिवसानिमित्त सगळेच शुभेच्छा देताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तसेच या म्हशीला लहानगे गिफ्टही देत असल्याचे दिसत आहे. १३ मार्च हा नाजुकाचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी ढोलताशाही वाजविण्यात आला असल्याचे याठिकाणी दिसते. या नाजुकाला रंगरंगोटी करण्यात आली असून तिच्या अंगावर झगमगीत नवीन कपडेही घालण्यात आले आहेत.

ही म्हैस ज्यांची आहे त्या परिवारातील महिला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे म्हशीला औक्षण करतानाही दिसत आहेत. विशेष म्हणजे घरातील व्यक्तीच्या वाढदिवसाला ज्याप्रमाणे पक्वान्न केली जातात त्याचप्रमाणे या नाजुकाच्या वाढदिवसालाही पक्वान्न केली जातात. तिची गावातून मिरवणूक काढण्यात आल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही म्हैस दिवसाला १४ लिटर दूध देते, तिने आम्हाला खूप पैसा दिला असे या म्हशीची मालकीण सांगते. त्यामुळे आम्हाला तिच्याबद्दल विशेष प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही तिचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करतो असेही त्या म्हणाल्या.