नोकरीबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात. अर्थात प्रत्येकालाच आपल्याला चांगली नोकरी मिळावी असं वाटतं असतं. नोकरी आणि खासगी आयुष्य नीट बॅलेन्स म्हणजेच ज्याला वर्क लाइफ बॅलेन्स असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. कामाबरोबरच थोडी मज्जा, मस्ती आणि आरामही मिळावा असं सर्वांना वाटते. मात्र अशी नोकरी खरोखरच मिळू शकते का असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. नोकरीसंदर्भात सतत विचार करणारे अशी या चिंतेने ग्रस्त असणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहे कारण एक बिस्कीट कंपनी केवळ बिस्कीटांची चव घेण्यासाठी ४० हजार पाऊंड (जवळजवळ ४० लाख रुपये) वार्षिक पगार देत आहे. होय ही अफवा नाही खरोखरच स्कॉटलॅण्डमधील ‘बॉर्डर बिस्किट्स’ कंपनीने अशाप्रकारच्या नोकरीसाठी अर्ज मागवले असल्याचे वृत्त इंडिपेंडेंट या वेबसाईटने दिलं आहे.

‘बॉर्डर बिस्किट्स’ कंपनीने मास्टर बिस्किटर पदासाठी अर्ज मागवले आहेत. बिस्किटांची चव घेण्याच्या मोबदल्यात वर्षाला ४० लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. हा फूल टाइम जॉब असमार आहे. वर्षभरामध्ये ३५ अतिरिक्त सुट्ट्याही दिल्या जाणार आहेत. बिस्किटांची चव घेऊन त्यांच्या गुणवत्तेबद्दलचा अहवाल देणं हे या पदावरील व्यक्तीचे मुख्य काम असणार आहे. यासाठी मास्टर बिस्किटरला महिन्याला ३ लाख ३३ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बिस्किट निर्मितीसंदर्भातील ज्ञान असण्याबरोबरच चवीचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्य असणं अत्यावश्यक असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सतत संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना या व्यक्तीने सुचवणे आवश्यक आहे असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

‘बॉर्डर बिस्किट्स’चे कार्यकारी संचालक असणाऱ्या पॉल पार्किंस यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. “आम्ही वेगवेगळ्या लोकांनी यासाठी अर्ज करावा यासाठी प्रोत्साहन देत आहोत. काही निवडक उमेदवारांची निवड करुन त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल,” असं पॉल यांनी म्हटलं आहे. तर ‘बॉर्डर बिस्किट्स’च्या ब्रॅण्ड विभागाच्या प्रमुख असणाऱ्या सुजी कारलॉ यांनी, “आमची कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम चवीची आणि चांगल्या दर्जाची बिस्किटे देण्यासाठी कटीबद्ध आहे. कंपनीची हीच ओळख कायम ठेवण्यासाठी आम्ही सध्या मास्टर बिस्किटरचा शोध घेत आहोत,” असं म्हटलं आहे.