इंडोनेशियामधील एका महिलेने एक अजब दावा केला आहे. शरीरसंबंध ठेवल्याने आपण गरोदर राहिलो नसून वाऱ्याची झुळूक आल्याने आपण गरोदर झाल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. या महिलेने केलेला दावा ऐकून पोलिसही गोंधळले आहेत. या २५ वर्षीय महिलेने एका मुलीला जन्म दिला असून पश्चिम जावा प्रांतातील सिआनजूर येथील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सिती झिनाह असं या महिलेचं नाव असून तिने हे सारं काही अवघ्या तासाभरात घडल्याचा दावा केलाय. या तरुणीने, बुधवारी दुपारी घरातील हॉलमध्ये बसलेली असतानाच मला मी गरोदर असल्याचं जाणवलं, असा दावा केला आहे. “मी दुपारची प्रार्थना करुन घरामध्ये जमीनकडे तोंड करुन आराम करत होते तेव्हा अचानक वाऱ्याची एक झुळूक माझ्या योनीमधून शरीरामध्ये गेल्यासारखं मला वाटलं,” असं या मुलीने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितल्याचं वृत्त आहे. हा वाऱ्याची झुळूक घरातून गेल्यानंतर १५ मिनिटांनी माझ्या पोटात दुखू लागलं आणि पोटाचा आकार वाढल्याचं दिसून आलं, असंही या तरुणीने म्हटलं आहे. त्यानंतर काही वेळाने या तरुणीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये एका मुलीला जन्म दिला.
फोटो: ट्विटवरुन साभार
या तरुणीच्या गरोदरपणाची आश्चर्यचकित करणारा दावा पाहता पाहता या संपूर्ण परिसरामध्ये पसरला आणि त्याची दखल सरकारी अधिकाऱ्यांना घ्यावी लागली. या तरुणीला तिच्या आधीच्या पतीकडून एक मुलगा आहे. ती तिच्या पतीपासून चार महिन्यांपूर्वी वेगळी झालीय. मुलगी आणि आई दोघेही सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा प्रकार क्रिप्टीक प्रेग्नसीचा असू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये बाळ जन्माला येण्याच्या काही काळ आधीपर्यंत महिलेला ती गरोदर असल्याचं समजत नाही.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील सर्व शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत. पोलिसांनी या तपासामध्ये तरुणीच्या घटस्फोटीत पतीचीही चौकशी केलीय. या बातमीमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतरचा संभ्रम आम्हाला दूर करायचा आहे, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
फोटो : न्यूजफ्लॅश
काही जणांनी मात्र ही तरुणी खोटं बोलत असून विवाहबाह्यसंबंधांमधून जन्माला आलेल्या बाळाबद्दलचं सत्य लपवत असल्याची शक्यता व्यक्त केलीय. असं केल्यास या तरुणीवर धार्मिक संस्थांकडून कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची सध्या चर्चा असली तरी यापूर्वीही असा प्रकार इंडोनेशियामध्ये घडला आहे. कोकोनट या वेबसाईटनुसार मागील वर्षी जुलैमध्ये असाच प्रकार घडला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 18, 2021 6:49 pm