भाजपा खासदाराचा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यातील करोना केंद्रावरील शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये भाजपाचा खासदार तुंबलेलं शौचालय साफ करताना दिसत आहे. भाजपाचे खासदार जनार्दन मिश्रा हे कुचबिहारमधील करोना केंद्राच्या पहाणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मौगंज येथील करोना केंद्रातील शौचालय अतिशय अस्वच्छ असल्याचं दिसून आलं. त्यानंतर खासदारांनीच थेट हाताता ब्रश घेत हे शौचालय साफ करण्यास सुरुवात केली.

नक्की पाहा >> व्हायरल व्हिडीओ : मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या” 

या करोना केंद्रातील शौचालयाची परिस्थिती पाहून आदेश देत कोणाला तरी काम सांगण्याऐवजी मिश्रा यांनीच हातात ग्लोव्हज घालून शौचालयामधील टाइल्स घासण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिश्रा यांनी तेथील अधिकाऱ्यांना शौचालय स्वच्छ ठेवली जातील याची काळजी घ्यावी असे आदेश दिली. शौचालयामध्ये स्वच्छता रहावी यासंदर्भात काळजी घ्या. अस्वच्छता दिसली तर अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असा इशाराही मिश्रा यांनी दिला.

यासंदर्भात मिश्रा यांनी इंडिया टुडेशी फोनवर संवाद साधला. “कोणतंही काम छोटं नसतं. या साथीच्या कालावधीमध्ये डॉक्टरांपासून साफसफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण काम करत आहेत. शौचालय अस्वच्छ होतं म्हणून मी ते साफ केलं. या माध्यमातून लोकांमध्ये जागृती होईल आणि स्वत:हून अशी कामं करण्याची प्रेरणा मिळेल,” असं मत मिश्रा यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> नितीन गडकरींनी सांगितला YouTube वरुन होणाऱ्या कमाईचा आकडा; म्हणाले, “आज मला महिन्याला…”

मिश्रा यांनी अशाप्रकारे शौचालय साफ करण्याची ही काही पहिली वेळ नाही. २०१८ साली स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मिश्रा यांनी खाजुआ गावातील शाळेमधील शौचालय साफ केलं होतं. हे शौचालय अस्वच्छ असल्याने तसेच त्यामध्ये मातीचा ढीग असल्याने विद्यार्थ्यांना ते वापरता येत नव्हतं म्हणून मिश्रा यांनी स्वत:हून ते स्वच्छ केलं.

मिश्रा यांनी यापूर्वी रेवा जिल्ह्यातील रस्त्यांवर झाडूही मारलाय.