पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी (२० ऑक्टोबर २०२० रोजी) देशातील जनतेला संबोधित केलं. संध्याकाळी सहा वाजता मोदींनी देशातील जनतेला करोनासंदर्भात सावध राहण्याचं आवाहन केलं. देशामध्ये करोनाची सध्या काय परिस्थिती आहे, सरकारने तयारी कशी केली आहे, काय काळजी घ्यायला हवी, बाकी देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी कशी आहे अशा अनेक गोष्टींवर मोदींनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. अवघ्या १३ मिनिटं आणि ८ सेकंदाच्या या भाषणाचा व्हिडीओ भाजपाने सर्वच सोशल मीडियावरुन प्रमोट केला होता. मात्र यु ट्यूबवर या व्हिडीओला लाईक्सपेक्षा डिस्लाइक्सची संख्या अधिक होती. दोन महिन्यांपूर्वी मोदींच्या मन की बातच्या व्हिडीओलाही डिस्लाइक करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाने मंगळवारच्या भाषणासंदर्भात असं काही झाल्यास आधीपासूनच तयारी करुन ठेवली होती असं समजतं.

ट्विटरवर अनेकांनी मोदींनी मंगळवारी आपले भाषण सुरु केल्यानंतर यु ट्यूब व्हिडीओवर डिस्लाइकचा पाऊस पडल्याचे निदर्शनास आणून दिलं आहे. व्हिडीओ सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये भाजपाने या व्हिडीओला लाईक, डिस्लाइक करण्याचा पर्याय बंद केला. मात्र अनेकांनी या व्हिडीओला अवघ्या काही मिनिटांमध्ये साडेचार हजार डिस्लाइक असल्याचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे.

मात्र अशाप्रकारे भाजपाला लाइव्ह व्हिडीओदरम्यान लाइक डिस्लाइकचा पर्याय बंद करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापुर्वीही प्रवेश परिक्षांच्या मुद्द्यांवरुन मोदींच्या मन की बातच्या व्हिडीओला तरुणांनी डिस्लाइल केल्याचे वृत्त समोर आलं होतं. द क्विंटने यासंदर्भात दिलेल्या एका वृत्तामध्ये मोदींच्या या व्हिडीओवरील १५ हजार डिस्लाइक काढून टाकण्यात आले होते. युट्यूब अल्गोरिदममध्ये अनपेक्षित ट्रेण्ड दिसून आल्यास अशापद्धतीने लाईक किंवा डिस्लाइकची संख्या वाढते असं सांगितलं जातं.

भाजपाच्या व्हिडीओंवर डिस्लाइकचे प्रमाण वाढताना दिसत असल्याने भविष्यामध्ये या चॅनेलवर लाईक आणि डिस्लाइकचा पर्याय बंद करुनच व्हिडीओ अपलोड करण्याचा निर्णय घेतला जाईल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे फ्री प्रेस जर्नलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. भाजपाने मोदींच्या मन की बातला डिस्लाइक आल्यानंतर हा काँग्रेसचा गेम प्लॅन असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींची छवी खराब करण्यासाठी तुर्कीश बोट्सच्या मदतीने डिस्लाइक वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र यावरुन इंटरनेटवर चांगलीच चर्चा रंगल्याचे पहायला मिळात आहे.