अमेरिकेतील कनेक्टिकट शहरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचं नशीब रातोरात पालटलं आहे. शहरामध्ये एका ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एका सेलमध्ये या व्यक्तीने ३५ डॉलर म्हणजेच अंदाजे अडीच हजार रुपयांना एक चिनी मातीचं नक्षीकाम असणारं भांडं विकत घेतलं. मात्र नंतर हेच भांडं या व्यक्तीसाठी एक मोठं जॅकपॉट ठरलं आहे. या व्यक्तीने सहज खरेदी केलेलं हे चिनी मातीचं भांडं एक खास शैलीतील कलाकृतीमधून बनवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अमूल्य भांड्याची किंमत पाच लाख डॉलर म्हणजेच जवळपास तीन कोटी ६२ लाख ८७ हजारांच्या आसपास आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सफेद रंगाच्या या भांड्यावर निळ्या रंगांच्या पानाफुलांचं नक्षीकाम आहे. याचबरोबर या भांड्यावर असणारे इतर बारीक नक्षीकामही त्याच्या सौंदर्यात भर घालताना दिसत आहे. आता या खास कलाकृती असणाऱ्या भांड्याचा लिलाव केला जाणार आहे. २०२० मध्ये न्यू हॅवेन परिसरामध्ये लागलेल्या सेलमध्ये विक्रीसाठी ठेवलेलं हे भांडं खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पुरातन वास्तूआणि कालाकृतींमध्ये भरपूर रस होता. त्यामुळेच त्याने ३५ डॉलर्सला हे छोटंसं भांडं विकत घेतलं.

हे भांडं अंत्यंत दूर्मिळ असून अशाप्रकारची केवळ सात भांडी बनवण्यात आली होती, असं सांगण्यात येत. यापैकीच हे एक भांडं असून खरेदी करणाऱ्याला हे चक्क शहरातील एका सेलदरम्यान विकत मिळालं. १७  मार्चला न्यूयॉर्कमध्ये आता या भांड्याचा लिलाव होणार आहे. ज्या व्यक्तीने हे भांडं विकत घेतलं आहे त्यानेच यासंदर्भातील माहिती सोदबॉयला ईमेलवरुन दिली आहे. ज्या व्यक्तींकडे काही खास वस्तू असतात मात्र त्यांना या वस्तूंसंदर्भात फारशी माहिती नसते त्यांना त्याबद्दलची माहिती सोदबॉयकडून दिली जाते. जेव्हा या व्यक्तीला या भांड्यांचे महत्व सांगण्यात आलं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

सोदबायचे उपाध्यक्ष मॅकअटीर यांनी दिलेल्या माहितीनुसार या भांड्यावरील नक्षीकाम, आकार आणि निळ्या रंगावरुन हे भांडं चीनमध्ये १५ व्या शतकामध्ये चिनी मातीपासून तयार करण्यात आल्याचं स्पष्ट होतं आहे. मी स्वत: या भांड्याची तपासणी केली तेव्हा हे भांड मिंग राजवटीमध्ये इसवी सन १४०० च्या आसपास बनवण्यात आलं होतं, असंही मॅकअटीर म्हणाले.