ख्रिस्तोफ कार्सटेन लेझकानो नावाच्या मुलाने अतिशय अनपेक्षितरित्या चक्क विमानातच जन्म घेतला आहे. प्रवाशांनी भरलेल्या या विमानात अशाप्रकारे जन्म घेणारे हे बाळ अपेक्षित तारखेच्या ४ आठवडे आधीच जन्माला आल्याचे बाळाच्या आईने सांगितले आहे. विशेष म्हणजे सुदैवाने विमानतळावर बालरोगतज्ज्ञ आणि परिचारिका उपस्थित असल्याने त्यांनी या महिलेची उपलब्ध साधनांमध्ये प्रसूती केली. याआधी स्पिरीट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टर आणि परिचारिकांना मदत केली.

ख्रिस्टीना पेन्टोन ही ३६ आठवड्यांची गर्भवती असलेली महिला , टेक्सासमधील फोर्ट लॉडरडेल ते डॅलस या मार्गावरुन प्रवास करत होती. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ख्रिस्टीना प्रसूत झाली. विमानाचे उड्डाण झाल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत ख्रिस्टीनाला अस्वस्थ वाटायला लागले. ही गोष्ट तिने विमानातील कर्माचाऱ्याला सांगितली. त्याने पायलटला याची कल्पना दिल्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखत विमान आले त्या मार्गावर उलटे फिरवले.

विमानतळावर पोहोचण्याआधीच तिच्या गर्भाशयातून पाणी वाहू लागले आणि पुढच्या काही मिनिटांत तिने आपल्या मुलाला जन्म दिला. यावेळी विमानात बाजूला बसलेल्या सहप्रवाशाने बाळ जन्माला येण्याचा व्हिडिओ काढला आणि तो फेसबुकवर पोस्टदेखील केला. प्रसूती झाली तेव्हा ख्रिस्टीना तिच्या आणखी दोन मुलांसोबत विमानात होती. आमच्या विमान कर्मचाऱ्यांना वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगासाठी प्रशिक्षित कऱण्यात आले आहे. तसेच त्यांना विमानतळावर असणाऱ्या डॉक्टरांशीही संपर्क करता येतो. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा विमानतळावर बालरोगतज्ज्ञ उपस्थित असल्याने प्रसूती सुरळीत पार पडली.
या बाळाला वेगवेगळ्या भेटवस्तू देत एअरलाईन कंपनीने त्याचे जगात स्वागत केले. यामध्ये सगळ्यात मोठी भेट म्हणजे या बाळाला आयुष्यभरासाठी जून महिन्यात मोफत प्रवास करता येणार आहे. या विमान कंपनीने बाळाला ‘बॉर्न टू फ्लाय’ अशी उपाधीही दिली आहे.