22 July 2019

News Flash

Video: …म्हणून चर्चेत आहे #BoycottSurfExcel हॅशटॅग, पाहा व्हायरल जाहिरात

या जाहिरातीवरुन नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत

जाहिरात व्हायरल

होळी म्हणजे आपआपसातील मतभेद विसरुन एकत्र येत रंगांमध्ये रंगून जाण्याचा दिवस. असाच एक संदेश कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सर्फ एक्सेल’ या पावडर कंपनीने आपल्या एका होळी स्पेशल जाहिरातीमधून देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता याच जाहिरातीवरुन ‘सर्फ एक्सेल’चे प्रोडक्ट वापरू नका अशा अर्थाचा #BoycottSurfExcel हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आल्याने अनेकांनी या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे.

‘सर्फ एक्सेल’ने होळीनिमित्त ‘रंग लाए संग’ या कॅप्शनसहीत एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे.

काय आहे जाहिरातीमध्ये

या जाहिरातीमध्ये सफेद रंगाचे कपडे घालून एक लहान मुलगी होळीच्या दिवशी आपल्या परिसरामध्ये सायकलवरुन फेर फटका मारताना दाखवली आहे. या मुलीवर गल्लीमधील अनेक लहान मुले रंगाचे फुगे मारताना दिसतात. संपूर्ण परिसरात फिरुन झाल्यावर ही मुलगी एका इमारती समोर येऊन आपल्या मुस्लीम मित्राला हाक मारुन बाहेर बोलवते. ‘ये बाहेर सर्वांकडचे रंग संपले आहेत,’ असं सांगताच एक लहान मुलगा पांढरे कपडे घालून नमाज पठणासाठी मशिदीमध्ये जाण्यास घराबाहेर पडतो. ही मुलगी त्याला सायकलवरुन मशिदीपर्यंत सोडते. मशिदीच्या पायऱ्या चढताना ती मुलगी त्याला ‘नंतर रंग लावणार’ असं सांगते. यावर तो मुलगाही नाजूक हसतो.

‘हिंदुस्तान युनिलिव्हर’च्या मालिकीच्या असणाऱ्या ‘सर्फ एक्सेल’ने या जाहिरातीच्या माध्यमातून रंगाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येऊ शकतात असा संदेश दिला आहे. या जाहिरातीच्या शेवटी कंपनीची लोकप्रिय टॅगलाइन ‘दाग अच्छे हैं’ सुद्धा दाखवण्यात आली आहे.

युट्यूबवर २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीला आत्तापर्यंत ८७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सर्फची धुलाई करा: रामदेव बाबा

दरम्यान पतांजलीचे प्रमुख बाबा रामदेव यांनी ‘सर्फ एक्सेल’ला धुवून टाका अशा पद्धतीचे ट्विट केले आहे. ‘आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र सध्या जे सुरु आहे त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. असं वाटतयं की ज्या परदेशी ‘सर्फ’ने आपण कपड्यांची धुलाई करायचो आता त्याच ‘सर्फ’ची धुलाई करण्याचे दिवस आले आहेत,’ असं रामदेव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अनेकांनी या जाहिरातीला विरोध केला असतानचा काहींनी ही जाहिरात खूप सुंदर असल्याचे मत मांडले आहे. तर विरोधकांनी ‘सर्फ’चे प्रोडक्ट वापरू नका या हॅशटॅगबरोबरच कंपनीला ट्रोलही केले आहे.

First Published on March 11, 2019 12:59 pm

Web Title: boycott surf excel trends after ad on hindu muslim