आपल्या पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी ब्राझीलच्या फर्स्ट लेडी मार्सेला टेमर यांनी तलावात उडी मारली. खरं तर जीव धोक्यात घालून या मुक्या जीवाला वाचवल्याबद्दल त्यांचं कौतुक होण्याऐवजी त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

३४ वर्षीय मार्सेला यांचा प्रिय श्वान बदकांच्या मागे पळाला. त्यावेळी तो चुकून तलावात पडला. बाहेर येण्यासाठी तो अयशस्वी झाल्यानंतर मार्सेला यांनी मदतीची वाट न पाहता तलावात उडी मारली आणि त्याचे प्राण वाचवले. ही घटना गेल्या महिन्यात घडली पण या आठवड्यात ती समोर आली. यामुळे मार्सेला याचं कौतुक होण्याऐवजी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अनेकांनी या ‘धाडसा’साठी त्यांची खिल्ली उडवली आहे.

वाचा : जवानांनी शहीद मित्राच्या बहिणीचं थाटामाटात लावून दिलं लग्न!

ब्राझीलचे राष्ट्रपती असलेल्या मिशेल टेमर यांच्यावर भष्ट्राचारासारखे अनेक आरोप आहेत. ते देशाच्या इतिहासातील सगळ्यात कुप्रसिद्ध राष्ट्रपती आहेत अशी टीकाही त्यांच्यावर केली जाते. मार्सेल या टेमरपेक्षा ४० वर्षांनी लहान आहेत तसेच त्या सौंदर्यस्पर्धेच्या विजेत्या देखील आहेत. मार्सेला यांनी खरंतर श्वानाला वाचवण्यासाठी नाही तर बदकांना वाचवण्यासाठी तलावात उडी मारली अशी उपरोधिक टीका त्यांच्यावर होत आहे. तर टेमर यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांच्या श्वानानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यांसारख्या अनेक उपरोधिक टीकेच्या धनी मार्सेल ठरल्या आहेत.

वाचा : अखेर माझं काम संपलं.., फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांची कर्मचाऱ्यांसाठी भावनिक पोस्ट