आपण घरात एक किलो नाहीतर अगदीच पाहुणे येणार असतील तर ४ ते ५ किलोचे भरीत बनवतो. तेच हॉटेलमध्ये १० ते २० किलो वांग्यांचे भरीत बनवले जात असेल. पण ५ हजार किलो वांग्यांचे भरीत बनवले तर? प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर येत्या डिसेंबरमध्ये एक खास विक्रम करणार आहेत. जळगावमध्ये ते तब्बल ५ हजार किलो वांग्याचे भरीत बनवणार आहेत. आता इतक्या किलोंचे भरीत करणार म्हटल्यावर त्यासाठी तेवढी मोठी कढई तर हवीच. इतकी मोठी कढई कोण बनवून देणार असा प्रश्न आयोजकांसमोर उभा राहीला. त्यासाठी त्यांनी भांडी बनविणाऱ्या अनेकांशी संपर्क साधला. आता विश्वविक्रम पूर्ण करायचा म्हटल्यावर इतके मोठे भांडे तर हवेच होते. अखेर कोल्हापूरचे उद्योजक निलेश पै यांनी हे आव्हान स्वीकारले.

मागील चार महिन्यापासून ही कढई बनविण्याचे काम सुरु असून स्टेनलेस स्टीलमध्ये ही कढई बनविण्यात आली आहे. या भल्यामोठ्या कढईसाठी २० हून अधिक कामगार दिवसरात्र राबत आहेत. आता ही कढई पूर्ण झाली असून लवकरच त्यामध्ये खमंग असे भरीत केले जाणार आहे. जळगावमधील खान्देशी भरीत प्रसिद्ध असून हे भरीत जळगावमधील लोकांना देण्यात येणार आहे. याआधी विष्णू मनोहर यांनी अडीच हजार किलोंच्या भरताचा विक्रम केला होता. स्वत:चाच विक्रम मोडत ते आता हा ५ हजार किलोंचा विक्रम करत आहेत. त्यामुळे जळगावच्या भरीताला कोल्हापूरचा साज असेल यात शंका नाही.