दिवसेंदिवस तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन शोधांमुळे मनुष्याच्या जीवनात अनेक आमुलाग्र बदल होत आहे. अनेक वेळा लोक व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीने ऑनलाइन शॉपिंग करतानाही दिसतात. मनुष्यासाठी ही बाब आता सर्वसाधारण झाली आहे. पण जर पक्ष्यांनी असं केलं तर ? हैराण करणारा असाच प्रसंग ब्रिटनमध्ये समोर आला आहे. येथे आफ्रिकी ग्रे प्रजातीच्या एका पोपटाने व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीने आइस्क्रीमशिवाय फळं आणि भाज्यांची ऑर्डर दिली.

या पोपटाने स्मार्ट स्पीकर अलेक्साच्या मदतीने ही खरेदी केली. त्योन अॅमेझॉनवर आइस्क्रीमपासून टरबूज, सुका मेवा आणि ब्रोकलीचीही ऑर्डर दिली. इतकेच नव्हे तर लाईट बल्ब आणि पतंगही मागवले. ‘डेली मेल’च्या एका वृत्तानुसार या पोपटाचे नाव रोको आहे. जो आधी बर्कशायर येथील नॅशनल अॅनिमल वेल्फेअर ट्रस्टच्या अभयारण्यात वास्तव्यास होता.

आफ्रिकी ग्रे प्रजातीचे पोपट मनुष्याचा आवाज आणि शब्दांची नक्कल करण्यात तरबेज असतात. अभयारण्यातील असुविधेमुळे तो पोपट एका कर्मचाऱ्याबरोबर राहत होता. तो नेहमी अलेक्साच्या मदतीने आपले आवडते गाणे ऐकत असत आणि एक दिवस त्याने त्याच्या मदतीने सामानही मागवले.