प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. परंतु ही बाब सर्वच ठिकाणी लागू होईल असंही नाही. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. ब्रिटनमधील रॉन शेफर्ड नावाच्या व्यक्तीनं तब्बल आठ लग्न केली आणि नवव्या लग्नाच्या तयारीत असतानाच त्याची गर्लफ्रेंडनंच गायब झाली. ६८ वर्षांचे रॉन शेफर्ड हे २८ वर्षीय तरूणीशी लग्न करण्याच्या तयारीत असतानाच त्यांची गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत पळून गेली आणि त्यांच्या नवव्या लग्नाचा डाव फसला.

ब्रिटनमध्ये सर्वाधिक लग्न करण्याचा विक्रम रॉन शेफर्ड यांच्या नावे आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या आठ पत्नींना घटस्फोट दिला आहे. त्यानंतर आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही कमी वय असलेल्या एका २८ वर्षीय मुलीला डेट करत होते. दरम्यान, ती दुसऱ्यासोबत पळून गेल्यानंतर रॉन यांनी आपल्या आयुष्यातील मोठा गौप्यस्फोट केला. आपलं आठवं लग्न झालेलं असतानाच त्या मुलीला आपण डेट करत होतो, असं त्यांनी सांगितलं. तसंच काही कारणांमुळे आमच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यानंतर तिनं मला फेसबुकवरही ब्लॉक केलं. तिचं एका तरूणासोबत प्रेमसंबंध जुळले असल्याची माहितीही एकानं दिली. त्यामुळे फार वाईट वाटल्याचंही रॉन यांनी सांगितलं.

रॉन यांनी यापूर्वी आठ लग्न केली होती. तसंच त्यांना आठ मुलंही आहेत. रॉन ज्या मुलीला डेट करत होते ती त्यांच्या मोठ्या मुलापेक्षाही वयानं लहान होती. रॉन यांनी १९ व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. २०१५ मध्ये रॉन यांची ख्रिसमसदरम्यान त्या तरूणीशी ओळख झाली होती.