ब्रिटनमधील एका भारतीय रेस्तराँची सध्या सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा आहे. कारण, या रेस्तराँच्या मालकाने चक्क समोसा थेट अंतराळात पाठवण्याचा अनोखा प्रयत्न केलाय. ऐकून विचित्र वाटत असलं तरी हे खरंय.

ब्रिटनमधील बाथ शहरातील ‘चाय वाला’ नावाच्या लोकप्रिय रेस्तराँ मालकाने समोसा अंतराळात पाठवण्याचा हा अनोखा प्रयत्न केला. यासाठी मालकाने ‘वेदर बलून’चा वापर केला. मालकाने समोसा पाठवण्याचा तीन वेळेस प्रयत्न केला, अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याला बरंच यश मिळालं. “समोसा अंतराळात पाठवेन असं मी एकदा मजेत म्हटलो होतो, नंतर या संकटकाळात लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी एकदा समोसा अंतराळात पाठवण्याचा प्रयत्न करुन बघावा असा विचार मनात आला आणि हा प्रयोग केला”, असं मालक निरज गाधेर यांनी यूपीआय या वेबसाइटला सांगितलं. कोविडमुळे निर्माण झालेल्या निराशाजनक वातावरणात थोडीशी गंमत करण्याच्या विचाराने समोसा अवकाशात पाठवल्याचं ते म्हणाले.

रेस्तराँचे मालक निरज यांनी समोसा पाठवण्यासाठी हेलियमच्या फुग्यांचा वापर केला होता. त्यांनी युट्यूबवर समोसा पाठवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी तीन वेळेस समोसा पाठवण्याचा प्रय़त्न केला, पण पहिल्या प्रयत्नात त्यांच्या हातातून हेलियमचा फुगा निसटला, दुसऱ्यावेळी फुग्यात हेलियम वायू अपुरा होता, तर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. पण फुगा सोडल्यानंतर काही काळाने त्याचा जीपीएसशी असलेला संपर्क तुटला आणि तो फ्रान्समध्ये एका शेतात कोसळल्याचं स्पष्ट झालं. अंतराळात समोसा सोडण्यासाठी रेस्तराँने पूर्ण तयारी केली होती. फुग्यामध्ये कॅमेरा आणि जीपीएस ट्रॅकरही लावलं होतं, नंतर फुगा उंचावर गेल्यानंतर जीपीएस ट्रॅकर खराब झालं. जीपीएस पुन्हा सुरू झाल्यानंतर समोसा अवकाशात तर गेला पण दुसऱ्याच दिवशी तो फ्रान्समध्ये एका शेतात कोसळल्याचं स्पष्ट झालं. बघा व्हिडिओ :

सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये हा चर्चेचा विषय झालाय.

आणखी वाचा : ( अवकाशातून समोशाचं क्रॅश लॅण्डिंग)