जगप्रसिद्ध ब्रिटश लक्झरी ब्रँड बर्बरीनं न विकले गेलेले तब्बल २५६ कोटींचे कपडे, अॅक्सेसरीज् आणि परफ्युम्स जाळून टाकले आहेत. अनेकदा न विकले गेलेले कपडे सवलतीच्या दरात विकले जातात. जगभरात अनेकजण हाच फंडा वापरून नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. बर्बरीनं मात्र या न विकल्या गेलेल्या कपड्यांतून पैसे कमावण्यापेक्षा ते जाळून टाकण्याचा पर्याय निवडला आहे. हे कपडे किंवा अॅक्सेसरीज कोणीही कमी किंमतीत विकू नये किंवा त्यांची चोरी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास ८०६ कोटींची न विकली गेलेली उत्पादनं बर्बरी ब्रँडनं जाळून टाकली आहेत.

बर्बरी ब्रँडच्या न विकल्या गेलेल्या मालाला काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही मागणी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ५०% नीं वाढली आहे. हा माल चुकीच्या व्यक्तींच्या हाती पडू नये किंवा याचा गैरवापर करून कोणीही नफा कमवू नये यासाठी बर्बरीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या उत्पादनांचा गैरवापर होऊ नये यासाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणारी ही काही पहिलीच कंपनी नाही. याआधी अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या न विकल्या गेलेल्या उत्पादनांचा गैरवापर होऊ नये म्हणून ती नष्ट केली होती.