‘चांगलं शिकलात तर चांगली नोकरी मिळेल. जर चांगली नोकरी असेल तर आर्थिक परिस्थिती सुधारेल. नाहीतर नाक्यावर चहा विकण्याची वेळ येईल’ थोड्याफार फरकानं अशा कानपिचक्या  घरोघरी अनेकांना पडत असतात. पण, जमाना बदलला आहे. आता चहा विकूनही श्रीमंत होता येतं. थोडंसं कौशल्य, सोशल मीडियावर प्रसिद्धी, जाहिरातबाजी केली की चहा विकूनही कोट्यधीश होता येतं हे कित्येकांनी दाखवून दिलं. चंढीगडमध्ये राहणाऱ्या उपमा विरदी या २६ वर्षीय मुलीनं ऑस्ट्रेलियात चहा विकून दाखवला. ‘चायवाली’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुणीनं ‘बिझनेस वुमन ऑफ द इअर’चा किताबही पटकावला.

आता चहा विकून आणखी एक महिला कोट्यधीश झाली आहे. ब्रुक इडी ही महिला २००२ साली भारतात आली होती. भारत भेटीदरम्यान तिने खेडेगावांना भेट दिली. तिथल्या आले घातलेल्या चहाची चव तिनं चाखली आणि या पेयाच्या ती अक्षरश: प्रेमात पडली. खेडोपाडी मिळणाऱ्या प्रत्येक चहाची चव वेगळी असते हे तिच्या हळूहळू लक्षात आलं. कोण आले, कोण गवती चहा तर कोणी वेलचीची सालं टाकून चहा तयार करतात हे तिला समजलं. कोलोरॅडोमध्ये जाऊन तिनं आपला चहाचा स्टार्टअप सुरू केला.

‘भक्ती चाय’ नावानं तिनं हे स्टार्टअप सुरु केलं. विशेष म्हणजे यापूर्वी चहाची कधीही अशी चव न चाखलेल्या अनेकांना हा देशी चहा खूपच आवडला. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की चहाची कल्पना लोकांना इतकी आवडली की आतापर्यंत यातून मी २२७ कोटी रुपये कमावल्याचं तिनं म्हटलं आहे. ती वेगवेगळ्या प्रकराचे चहा विकते. विशेष म्हणजे हा चहा सर्व्ह करण्यासाठी ती मेसन जार किंवा वेगवेगळ्या बाटल्यांचा वापर करते तिची सर्व्हिंग पद्धत तसेच भक्ती चायमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या चवीच्या चहा चाखण्यासाठी नेहमीच गर्दी असते.