बीएसएफ असिस्टंट कमांडंट परिक्षेत देशभरातून पहिला आलेल्या नबील अहमद वाणीने बसमध्ये एका तरुणीची छेड काढणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आहे. नबीलने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली आहे. नबीलने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुलींनी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चपलेने धडा शिकवण्याचा सल्ला दिला आहे. नबीलने त्याच्या पोस्टमधून बसने प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांच्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्याच महिन्यात बीएसएफच्या असिस्टंट कमांडंट परिक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावलेल्या नबीलने छेडछाडीचा संपूर्ण प्रसंग फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे. ‘काल मी बसमधून जम्मूहून उधमपूरला जात होतो. यावेळी एक १७ ते १८ वर्ष वयाची मुलगी माझ्यासमोर बसली होती. मी हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणे ऐकत होते. अचानक माझ्यासमोर बसलेली ती मुलगी उठली आणि तिच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला ओरडू लागली. गाणे ऐकत असल्याने मला त्या मुलीचा आवाज ऐकू आला नाही. मी तिला माझी सीट बसायला दिली आणि तिला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारले. तेव्हा तिने मला तिच्या शेजारी असलेली ४० ते ४५ वर्ष वयाची व्यक्ती तिला स्पर्श करत असल्याचे सांगितले. दोनवेळा सांगूनही ती व्यक्ती वारंवार तेच करत होती.’

नबील वाणीने पुढे त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये बसमधील बघ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘बसमधील त्या छेडछाडीच्या घटनेनंतर मी बस थांबवायला लावली. मात्र इतके होऊनही बसमधील कोणत्याही प्रवाशाने त्या व्यक्तीबद्दल एक शब्दही काढला नाही. हे पाहून मी हैराण होतो. मी त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. मी त्या व्यक्तीचा फोटो आणि व्हिडीओदेखील काढला. बसमधील लोकांची वर्तणूक लाज आणणारी होती. मी मुलींना सांगू इच्छितो की, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. छेडछाडीच्या विरोधात आवाज उठवा. त्यांना चपलेची ताकद दाखवा’, अशा शब्दांमध्ये नजीब वाणीने महिलांना शांत न राहण्याचा सल्ला दिला आहे.