सोशल मीडियावर देशभक्तीच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारणारे अनेकजण आपण पाहिले असतील. यापैकी अनेकजण वेळ पडल्यास सैनिकांप्रमाणे शत्रूशी दोन हात करू वैगैरे थाटाच्या फुशारक्याही मारताना दिसतात. मात्र, युद्धासारखा बाका प्रसंग सोडला तरी सैनिकांचे दैनंदिन आयुष्यही किती खडतर आणि परीक्षा पाहणारे असते, याची कल्पना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका छायाचित्रावरून येऊ शकते. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय जवान सीमाभागात खडा पहारा देताना दिसत आहेत. मात्र, या ठिकाणी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे या जवानांना २४ तास पाण्यात उभे राहून पहारा द्यावा लागत आहे. यामुळे जवानांची तब्येत बिघडू शकते. शिवाय साप, विंचू चावण्याचाही धोका असतो. मात्र, या कशाचीही तमा न बाळगता किंवा तक्रार न करता हे जवान पुराच्या आपल्या मातृभूमीच्या रक्षणाचे कर्तव्य बजावत आहेत.

एरवी आपल्यापैकी अनेकजण ऑफिसला किंवा इतर कुठेही जात असताना पाऊस पडला तर भिजल्या अंगाने काम करायला लागते, अशी कुरकूर करतात. मात्र, या छायाचित्रातील भारतीय जवान तब्बल चार ते पाच फूट पाण्यात उभे राहून पहारा देत आहेत. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अशा अनेक परिसरात पाच फुटांपर्यंत पाणी भरले आहे. परंतु अशा कठीण स्थितीतही पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांचे काही फोटो समोर आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव बीएसएफकडून ही छायाचित्रे कुठल्या परिसरातील आहेत, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, २४ तास पाण्यात उभे राहून पहारा देणाऱ्या भारतीय जवानांचे ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.