मुंबईसह उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अंधेरी, हिंदमाता, कुर्ला, अंधेरीसह अनेक सखल ठिकाणी पाणी साचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रुळांवरही पाणी आलं असून तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. एकीकडे शहरभर पाणी भरलं असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना कफ परेडमध्ये एका इमारतीला अक्षरश: धबधब्याचं स्वरुप आलं आहे. इमारतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कफ परेडमधील एका निर्माणधीन इमारतीचा आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एखाद्या पर्यटनस्थळी धबधब्यावरुन पाणी कोसळतं त्याप्रमाणे इमारतीवरुन पाणी कोसळत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. मुसळधार पावसामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे.