X

यापुढे कपडे जाळणार नाही, ५ वर्षांत ८०६ कोटींची उत्पादनं जाळणाऱ्या बर्बरी ब्रँडचा निर्णय

काही महिन्यांपूर्वी तब्बल २५६ कोटींचे कपडे, अॅक्सेसरीज् आणि परफ्युम्स जाळून त्याची राखरांगोळी केल्यानं जगप्रसिद्ध ब्रिटश लक्झरी ब्रँड 'बर्बरी' चर्चेत आला होता.

तब्बल २५६ कोटींचे कपडे, अॅक्सेसरीज् आणि परफ्युम्स जाळून त्याची राखरांगोळी केल्यानं जगप्रसिद्ध ब्रिटश लक्झरी ब्रँड ‘बर्बरी’ चर्चेत आला होता. पण, यापुढे अशाप्रकारे न विकला गेलेला माल जाळून न टाकण्याचा निर्णय या ब्रँडनं घेतला आहे. त्याचबरोबर प्राण्यांच्या मऊ फरचाही वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बर्बरीनं घेतला आहे.

बर्बरी ब्रँडच्या न विकल्या गेलेल्या मालाला काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही मागणी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ५०% नीं वाढली आहे. हा माल चुकीच्या व्यक्तींच्या हाती पडू नये किंवा याचा गैरवापर करून कोणीही नफा कमवू नये . तसेच या ब्रँडची न विकली गेलेली उत्पादनं सवलतीच्या दरात विकून कोणीही ब्रँडची प्रतिमा कमी करू नये यासांरख्या अनेक कारणामुळे हा ब्रँड आपली उत्पादनं जाळत आहे. काही वर्षांपासून न खपलेला माल जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न हा ब्रँड करत आहे.

गेल्या पाच वर्षांत जवळपास ८०६ कोटींची न विकली गेलेली उत्पादनं बर्बरी ब्रँडनं जाळून टाकली आहेत, असंही समोर आलं आहे. यावर अनेकांनी कडाडून टीकाही केली होती. ही टिका गांभीर्यानं घेत बर्बरीनं आता दुसरा पर्याय शोधला आहे. यापुढे न विकल्या गेलेल्या उत्पादनांचा पुर्नवापर करायचा, त्यात बदल करायचे किंवा ते दान करायचे असं कंपनीनं ठरवलं आहे.

तसेच प्राण्यांच्या फरपासून तयार करण्यात आलेले कोणतेही कपडे पुढील महिन्यांपासून बर्बरीच्या आउटलेट्समध्ये दिसणार नाही असाही निर्णय कंपनीनं घेतला आहे. ससा, कोल्हा, एशिअॅटिक रॅकून, मिंक या प्राण्यांच्या फरपासून तयार करण्यात आलेले कोट बर्बरीची खासियत आहे. पण यापुढे कंपनीत काही सकारात्मक बदल होतील असं कंपनीनं नुकतंच जाहीर केलं आहे.