मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या मक्केच्या परिसरात बोर्ड गेम खेळतानाचा चार महिलांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सौदी अरेबियामध्ये सध्या मोठा वाद सुरू आहे. बुरखा परिधान केलेल्या या महिला पवित्र मशिदीच्या परिसरात खेळत होत्या. यावरुन वाद झाल्यानं सौदी अधिकाऱ्यांनी पत्रक जारी केलं आहे.

‘गेल्या आठवड्यात सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. मशिदीच्या परिसरात काही महिला खेळत असल्याची बाब काहींनी सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. हे समजताच काही महिला सुरक्षारक्षक त्यांच्यापाशी गेल्या. सुरक्षारक्षकांनी त्यांना हटकलं. तसेच मशिदीच्या परिसरात खेळ खेळण्यापासून या चौघींना मज्जाव केला. तेव्हा या महिला खेळ बंद करून निमुटपणे निघून गेल्या.’ असं जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

स्टेप फिड या वेबसाईटवरून सुरूवातीला हा फोटो प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर मुस्लिमबहुल देशांमध्ये हा फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाल्यानंतर यावरून मोठा वाद पेटला. काहींनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या महिलांनी पावित्र्य भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.