बॉस हा आपल्या कंपनीच्या भल्यासोबतच कर्मचाऱ्यांचाही विचार करणारा असला तर कर्मचारीही तितकेचं आनंदानं काम करतात. ब्रिटनच्या एका व्यावसायिकानं आपल्या कंपनीचे प्रॉफिट शेअर्स हे आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून टाकले. त्याचा फायदा हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना इतका झाला की कंपनीतील कर्मचारीही कोट्यधीश झाले. कंपनीचे शेअर्स ज्यावेळी तेजीनं वर गेले आणि कंपनीला मोठा नफा झाला त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला.
द हट ग्रुप असं त्या कंपनीचं नाव असून त्यांच्या मालकाचं नाव मॅथ्यू होल्डिंग आहे. त्यांनी आपल्या कंपनीच्या नफ्यातील ८३० दशलक्ष पौंड म्हणजे जवळपास ८ हजार १८३ कोटी रूपयांचे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून टाकले. त्यांनी एक बाय बॅक स्कीम चालवली आणि ती सर्व कर्मचाऱ्यांसाठी होती. या स्कीमचा फायदा त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना जसा मिळाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता. त्यांच्या मॅनेजर्सनं कर्मचाऱ्यांची नावं घेऊन ती मॅथ्यू यांना दिली. या स्कीमचा फायदा त्यांच्या पर्सनल असिस्टंटसह कंपनीतील ड्रायव्हर्सनाही झाला. आपल्याला इतके पैसे मिळाले की वयाच्या ३६ व्या वर्षीही आपण निवृत्ती घेऊ, असं त्यांच्या पर्सनल असिस्टंटनं सांगितलं.
“मी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नफा वाटून देण्याचा निर्णय घेतला. यासाठीच ही स्कीम सुरू केली. सर्वांना मोठी रक्कम मिळाली आहे. यावेळी व्यापाराच्या विरोधात अनेक जण बोलत होते. परंतु मला शेअर्स वर जातील यावर विश्वास होता. परंतु कोणीही परफेक्ट नसतं पण त्यांना नफी आणि पैशांमधील हिस्सा हवा असतो,” असं त्यांनी ब्रिटनमधील वृत्तपत्र मिररशी बोलताना सांगितलं.
मॅथ्यू यांनी २००४ मध्ये जॉन गॅलमोर यांच्यासोबत द हट या समूहाची स्थापना केली होती. गेल्या १६ वर्षांपासून त्यांची कंपनी नफा कमवत आहे. त्यांनी आपल्या शेअर होल्डर्सनाही १.१ अब्ज डॉलर्सता बोनसही दिल्याचं म्हटलं जात आहे. द हट समूहानं दोन महिन्यांपूर्वी आपला आयपीओ आमला होता. त्यावेळी कंपनीचं मार्केच कॅपिटल अंदाजे ८० हजार ५२१ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात होतं. सध्या ही कंपनी १६४ देशांमध्ये आपला व्यवसाय करत आहे. पहिल्यांदाच मॅथ्यू यांचं नाव फोर्ब्सच्या अब्जाधिशांच्या यादीत आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 6:08 pm