सध्या देशभरामध्ये ‘मी टू’ मोहिमेची चर्चा सुरु आहे. अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक आत्याचाराला या मोहिमेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. त्यामुळेच महिलांची सुरक्षेसंदर्भातील प्रश्नांनी पुन्हा नव्याने डोकं वर काढलं आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर एक सकारात्मक ट्विटची चर्चा सगळीकडे आहे.

प्रियष्मिता गुहा या तरुणीने एका उबर चालकाबद्दल घडलेला किस्सा ट्विट केला आहे. या ट्विटमधील माहितीनुसार संतोष नावाच्या उबर चालकाने प्रियष्मिता आणि तिच्या आईला रात्री एक वाजण्याच्या सुमारास नियोजित स्थळी उतरवले. मात्र त्या दोघी जिथे राहतात तेथील गेट बंद होते. त्यामुळेच संतोषने तेथून निघून जाण्याऐवजी त्या दोघींबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. तो दीड तास तेथेच थांबून होता. त्याला प्रियष्मिताने जाण्यास सांगितले असता त्याने, ‘तुम्हाला दोघींनी एकटं सोडून मी जाणार नाही’ असं सांगितलं.

प्रियष्मिता आणि तिच्या आईला रात्रीच्या वेळी एकट न सोडण्याच्या आपल्या निर्णयासाठी त्याने पुढचे भाडेही नाकारले. याबद्दल प्रियष्मिताने मी आणि आई त्याचे आभारी आहोत असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. एक हजार ४०० हून अधिक लोकांनी ट्विट केलं असून चार हजार ८०० जणांनी लाइक केले आहे. तसेच उबरने या प्रसंगाबद्दल बोलताना आम्हाला संतोषचा अभिमान असल्याचे सांगितले आहे.

तसेच प्रियष्मिता तुझा संदेश आम्ही संतोषपर्यंत पोहचवू असेही उबरने ट्विट करून तिला सांगितले आहे.