‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या यादीत नाव मिळवणं ही प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. मात्र या यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी अथक परिश्रमांची गरज असते. जगातील दुर्मिळ आणि सऱ्यांपासून  निराळं काहीतरी करणाऱ्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात येतो. आतापर्यंत या यादीमध्ये अनेकांनी स्थान मिळविले असून या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. कंबोडियामधील नागरिकांनी एक नवा विश्वविक्रम करुन या यादीमध्ये स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे या नव्या विश्वविक्रमाचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

कंबोडियाने केलेल्या विश्वविक्रमामध्ये सर्वच स्पर्धकांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं यावेळी दिसून आलं. कंबोडियामध्ये जगातील सर्वात मोठा स्कार्फ तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. याच स्कार्फने सध्या धुमाकूळ घातला असून सारे विक्रम मोडीत काढले आहेत. खरं तर स्कार्फ हा मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र बदलत्या काळानुसार हे स्कार्फ आता मुलेही वापरताना दिसून येतात. त्यामुळे  सध्या तरुणाईमध्ये स्कार्फची चलती असल्याचं पाहायला मिळतं. हे स्कार्फ वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे असल्याचं पाहायला मिळतं. मात्र याच स्कार्फने सध्या वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं पाहायला मिळत आहे.

विश्वविक्रम करण्यासाठी  कंबोडियामध्ये चक्क ८८ सेंटीमीटर रुंदीचा आणि १ हजार १४९.८ मीटर लांबीचा मोठा स्कार्फ तयार करण्यात आला असून या स्कार्फचा समावेश ‘गिनीज वर्ल्ड’मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा स्कार्फ हातमागाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हा स्कार्फ तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. स्कार्फ तयार करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रचंड मेहनत केली असून स्कार्फच्या उत्तम कारागिरीतून ती दिसून येत आहे. त्यामुळेच या स्कार्फचा गिनीज वर्ल्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.