वर्षभरापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका ३७ वर्षीय महिलेने सलग ५४ तास पोहोण्याचा विक्रम केला आहे. या अमेरिकन महिलेचे नाव सारा थॉमस आहे. इंग्लिश खाडीत सलग ५४ तास पोहोण्याचा विक्रम करणारी सारा जगातील पहिलीच महिला आहे.

इंग्लिश खाडी ही पोहण्यास जगातील सर्वाधिक आव्हानात्मक खाडी आहे. या खाडीतील पाण्याचे तापमान नेहमीच शून्य अंशाच्या खाली असते. अशा शरीर गोठवणाऱ्या थंड पाण्यात साराने रविवारी सकाळी आठ वाजता कोलोराडो इथून पोहण्यास सुरुवात केली. हा प्रवास तीन दिवसांनंतर मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता तब्बल २१५ किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर डोअर येथे संपला. या प्रवासादरम्यान साराने तब्बल चार फेऱ्या मारल्या.

साराने असा केला प्रवास

साराला लहानपणापासून पोहण्याची आवड होती. परंतु तिला पोहण्याच्या शर्यतीपेक्षा लोकांना अचंबीत करण्याऱ्या विक्रमांमध्येच जास्त रस होता. त्यामुळे तिने जगातील सर्वाधिक धोकादायक समुद्र, नद्या, खाड्या यांचा शोध घेऊन त्यात पोहण्यास सुरुवात केली. अथक परिश्रम आणि सरावाच्या जोरावर सारा प्रतिकूल परिस्थितीत पोहण्यात तरबेज झाली. २००७ साली साराने सलग ८९ किलोमीटर पोहण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर २०११ साली तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. या आजारातून बाहेर यायला तिला जवळपास तीन वर्ष लागली. परंतु ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बाहेर येताच २०१६ साली तिने तब्बल १२८.७ किलोमीटर पोहण्याचा विक्रम केला. या विक्रमानंतर सारा घरी शांत बसेल अशी अपेक्षा तिच्या पालकांना होती. मात्र तिने आपलाच विक्रम तोडून तब्बल २१५ किलोमीटर पोहण्याचा एक नवाच विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमामुळे आता तिला सुपर ह्यूमन म्हणून ओळखले जाते.